Shubman Gill 1000 : शुबमन गिलची विक्रमाला गवसणी, शतक ठोकून बनला एक हजारी मनसबदार!

Shubman Gill 1000 : शुबमन गिलची विक्रमाला गवसणी, शतक ठोकून बनला एक हजारी मनसबदार!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill 1000 : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज शुबमन गिलने वनडेतील तिसरे शतक झळकावले. हैदराबादच्या मैदानावर त्याने 87 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांसह तीन अंकी धावसंख्या गाठली. गिलचे हे सलग दुसरे वनडे शतक ठरले. तत्पूर्वी, 15 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात उजव्या हाताच्या सलामीवीराने शतकी खेळी साकारली होती. यासह आजच्या सामन्यात त्याने वन-डेतील एक हजार धावांचा पल्ला गाठला.

गिल हा वन-डे सामन्यात डावाच्या बाबतीत सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे पूर्वी गिलने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 894 धावा केल्या होत्या. त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 106 धावांची गरज होती. अखेर बुधवारच्या सामन्यात त्याने हा टप्पा गाठला आणि हजार धावा पूर्ण केल्या.

याचबरोबर त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले. या दोघांनी वन-डे क्रिकेटच्या 24 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसरीकडे, गिलने केवळ 19 डावांमध्ये ही मजल गाठली आहे. यासह तो इतक्या कमी डावांमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 66 पेक्षा जास्त राहिली असून यात त्याच्या बॅटने तीन शतके आणि पाच अर्धशतकेही केली आहेत.

किवींविरुद्ध सावध सुरुवात

गिलने रोहित शर्मासोबत डावाची सावधपणे सुरुवात केली. नंतर चांगले फटके मारत धावफलक हलता ठेवला. एकीकडे रोहित, विराट, सूर्या, ईशान किशनसारखे मोठे फलंदाज तंबूत परतले असताना गिलने मात्र जबाबदारीने संघाला सावरले. (Shubman Gill 1000)

नेटिझन्स या 23 वर्षीय खेळाडूच्या वन-डे फॉर्मेटमधील उत्कृष्ट प्रदर्शनाचे कौतुक करत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि खेळातील तज्ञांनी 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरे शतक झळकावल्याबद्दल गिलचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियावर स्तुतीसुमने उधळली. (Shubman Gill 1000)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news