पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Murder Case) साकेत न्यायालयाने आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे. विशेष सुनावणीसाठी त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले आसता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात सांगितले की, ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली. ही घडलेली घटना आठवण्यात आपल्याला अडचण येत आहे. पण तपासात सहकार्य करत असल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले.
पोलिसांना अद्याप या हत्या प्रकरणातील शस्त्रे सापडलेली नाहीत. श्रद्धाच्या डोक्याचा एक भागही सापडलेला नाही. फक्त काही हाडे आणि जबड्याचा काही भाग सापडला आहे. या घटनेतील कपडेही पोलिसांनी जप्त केलेले नाहीत. पोलीस श्रद्धाचा फोन शोधत आहेत.
श्रद्धा हत्याकांड हा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी १५ जिल्ह्यांतील १७५ पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, १८ मे रोजी खून केल्यानंतर पहाटेच्या सुमारास बॅग घेऊन जातानाचे आफताबचे एकूण तीन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आफताब पूनावालाने केलेल्या श्रद्धाच्या क्रूर हत्येने देशभर संतापाची लाट उसळली असून, आफताबच्या विरोधात पक्के पुरावे गोळा करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अद्याप अवयवाचे सगळे तुकडे हस्तगत झालेले नाहीत व हत्यारही सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांना जंग जंग पछाडावे लागत आहे.
श्रद्धाचा खून झाल्यानंतर आफताब काहीवेळा दिल्लीबाहेर जाऊन आला. त्यामुळे आता १५ जिल्ह्यांत १७५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छतरपूर-महरोली हे पोलिसांच्या तपासाचे केंद्र बनले आहे. प्रत्येक धागा तपासला जात आहे. शुक्रवारी पोलिसांच्या हाती तीन महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. १८ मे म्हणजे श्रद्धाच्या हत्येच्या दिवशीच पहाटे तीनवेळा तो घरातून बॅग घेऊन बाहेर पडल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास पाठीवर काळी सॅक आणि खांद्यावर निळे पुडके घेतलेला आफताब बाहेर जाताना त्या फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्याकडील सॅक व हातातील पुडक्यात श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.