पुढारी ऑनलाईन : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Singer KK) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. पण समोर आलेल्या माहितीनुसार, केके याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नाही, तर अनैसर्गिक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.
केके यांच्या डोके, चेहरा आणि ओठावर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळत आहे. त्याच्या मृत्यूबाबत न्यू मार्केट पीएसमध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर चौकशी आणि शवविच्छेदन केले जाईल. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे.
कोलकाता येथे एका लाईव्ह कॉन्सर्ट झाल्यानंतर काही तासांनी गायक केके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असल्याचे समजत होते. त्याला तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर कोलकाता प्रेक्षागृहात सुमारे 10 तासांपूर्वी झालेल्या मैफिलीचे व्हिज्युअल पहायला मिळाले होते.