शिवजन्मोत्सव – 2023 : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात मंडळांची लगबग

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी मूर्ती घडविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरविताना कारागीर कुंटुंब. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी मूर्ती घडविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरविताना कारागीर कुंटुंब. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी शिवजयंती साजरी होणार असल्याने जयंती उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. उत्सवात कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेत अविस्मरणीय सोहळा करण्यासाठी शहरातील मंडळे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती धूमधडाक्यात व वेगळेपणात साजरी होण्याची चिन्हे आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक सण, उत्सव साजरे करण्यांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच शिवजयंती निर्बंधाविना साजरा होणार असल्याने युवावर्गात उत्साह आहे. त्यामुळे जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक, देखावे, सजावटीवर विशेष भर दिला असून प्रशासनाकडून पूर्वपरवानग्या घेण्याचीही लगबग मंडळांच्या पदाधिकार्‍यांची दिसत आहे. त्यातच राज्यातील राजकीय उलथापालथनंतर शिंदे गट व ठाकरे गटासह इतर राजकीय पक्षांकडूनही शक्तिप्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे मंडप उभारणी, मिरवणुकीची पूर्वतयारी, ढोल पथकांची जुळवाजुळव करण्यावर मंडळांचा भर आहे. शिवजयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने विविध मंडळांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळे तसेच देखाव्याचे काम आंतिम टप्प्यात आले आहे. अशोक स्तंभ परिसरात शिवरायांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ही मूर्ती येणार्‍या-जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. तर आडगाव रोड, मुंबई महामार्गावर विविध ठिकाणी कारागिरांकडून मूर्ती घडविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना कारागीर दिसून येत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news