

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले शेकडो वर्षांनीसुद्धा ताठ मानेने अभेद्यपणे उभे आहेत. ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, वाढती व्यसनाधीनता आणि सामाजिक बेजबाबदारपणामुळे अनेक गडकिल्ले अस्वच्छतेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना स्वच्छ करण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, या उद्देशाने ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या यश संवाद विभागाने गडकोट संवर्धन व स्वच्छता मोहिम हाती घेतली. शिवजयंती निमित्ताने शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याची स्वच्छता करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
मंगळवारी (दि. 14) ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या 40 विद्यार्थ्यांनी सुमारे पाच तास काम करून चाळीसपेक्षा जास्त गोण्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, रिकाम्या गुटखा पुड्या, रिकामे सिगारेट पाकिटे भरून कचरा साफ केला. किल्ल्याच्या पायथ्याशी कचरा वाहून आणून योग्य ठिकाणी कचर्याची विल्हेवाट लावली.
सुमारे पाच तास मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली गडकोट संवर्धन व स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख, सुनीता गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, अनेक गडप्रेमी, शिवप्रेमी संघटना व पालकांनी भरभरून कौतुक केले.
शिवराय म्हणजे आमचे पांडुरंग, गडकोट म्हणजे आमची पंढरी
आणि या पंढरीची स्वच्छता करणे आमचे भाग्य. या भावनेतून ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी गडकोट संवर्धन व स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी होत आहेत. पुढील महिन्यात मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.
– प्रा. देविदास साळुंके, मोहिम समन्वयक