जेजुरीत आज ‘शासन आपल्या दारी’; विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन

जेजुरीत आज ‘शासन आपल्या दारी’; विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी येथे सोमवारी (दि. 7) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम होणार आहे. यात जिल्ह्यातील 8 लाख 86 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यानंतर तब्बल 253 वर्षांनी जेजुरी देवस्थानचा जीर्णोद्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. 349 कोटींच्या मंजूर आराखड्यातील 109 कोटींच्या कामांना सोमवारी सुरुवात होणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
शिवतारे म्हणाले, की कार्यक्रमस्थळी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आरोग्य शिबिर व नोकरी मेळावा होणार आहे. नोकरी मेळाव्याला जवळपास 40 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 5 हजार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

संबंधितांनी बायोडेटा व शैक्षणिक माहिती घेऊन कंपन्यांनी निर्धारित केलेल्या कक्षावर उपस्थित राहावे. दुपारी जेजुरी विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर 'शासन आपल्या दारी' अंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देणे, मान्यवरांची भाषणे होणार आहेत. जेजुरी शहराच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या आराखड्याला मान्यता देऊन तो मार्गी लावण्याचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

फुरसुंगी उरुळी देवाची पाणी योजनेचेही उद्घाटन

हवेली तालुक्यातील फुरसुंगी उरुळी देवाची ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कार्यान्वित झाली आहे. या गावांमध्ये नुकतेच पाणी पोहोचले आहे. 118 कोटी रुपये खर्चून जवळपास 4 लाख लोकांची तहान भागवणार्‍या या योजनेचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले जाणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news