पुढारी ऑनलाईन डेस्क : जामिया हिंसाचार प्रकरणात (Jamia violence case) साकेत न्यायालयाने शरजील इमामची निर्दोष मुक्तता केली. सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करताना २०१९ मध्ये जामियामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शरजील इमाम आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, २०२० च्या दिल्ली दंगलप्रकरणी कट रचल्याचा खटला सध्या शरजील इमाम विरोधात सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्याविरोधात यूएपीए लागू केले आहे, शरजीलला या प्रकरणात जामीन मिळालेला नाही.
प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी (Jamia violence case) शरजील इमामविरुद्ध खटला अजूनही सुरू आहे. ज्यामध्ये शरजीलने भारताचे ईशान्य राज्य आसाम भारतापासून तोडण्याबाबत विधान केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात इमाम यांच्यावर देशद्रोह आणि यूएपीएचा आरोप होता. या प्रकरणातही जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शरजील इमाम याची तुरुंगातून सुटका होऊ शकत नाही.
दरम्यान, आसिफ इक्बाल तन्हा याचीही जामिया हिंसाचार प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत असिफ म्हणाला की, साकेत न्यायालयाने आम्हा सर्व 13 विद्यार्थ्यांना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालय म्हणाले की, पोलिसांनी लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नाही. फक्त एका आरोपीने टायर जाळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्यावर फक्त त्या प्रकरणी आरोप लावले जातील. बाकी सर्व जणांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का ?