Share Market Closing | शेअर बाजारात साखरेचा गोडवा! ‘या’ कंपन्यांच्या शेअर्सची कमाल, जाणून घ्या सविस्तर

Share Market Closing | शेअर बाजारात साखरेचा गोडवा! ‘या’ कंपन्यांच्या शेअर्सची कमाल, जाणून घ्या सविस्तर

Share Market Closing : आज शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी राहिली. पण सुरुवातीला काहीसे अस्थिर वातावरण दिसून आले. यामुळे सकाळच्या सत्रात बाजाराने सपाट पातळीवर व्यवहार केला. पण फार्मा आणि ऑटो स्टॉक्सच्या जोरावर आज निफ्टीने १७,८०० वर झेप घेतली. तर सेन्सेक्सने ६०,३६० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स २३५ अंकांनी वाढून ६०,३९२ वर बंद झाला. तर निफ्टी ९० अंकांच्या वाढीसह १७,८१२ वर स्थिरावला. आज बाजारात खालच्या स्तरावरून मोठी रिकव्हरी झाली. बाजारातील तेजीत ऑटो आणि फार्मा शेअर सर्वात पुढे राहिले. शुगर स्टॉक्सनीदेखील आज बाजारात गोडवा आणला. पण IT स्टॉक्समधील विक्रीमुळे बाजारात काही प्रमाणात दबाव दिसून आला.

कॉर्पोरेट कंपन्यांची मार्च तिमाहीतील कमाई मजबूत राहील अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. तसेच महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन आकडेवारीकडेही गुंतवणुकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज सुरुवातीला शेअर बाजारात अस्थिर वातावरण दिसून आले होते. त्यानंतर दोन्ही निर्देशांक वधारले.

'हे' शेअर्स वाढले, 'हे' घसरले

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस हे टॉप गेनर्स होते. तर बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, ॲक्सिस बँक, मारुती पॉवर ग्रिड, नेस्ले, इंडसइंड बँक, एनटीपीसी, लार्सेन हे शेअर्स घसरले होते. निफ्टीवर बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब्स, अदानी एंटरप्रायजेस, एशियन पेंट्स हे वाढले होते. तर पॉवर ग्रिड, नेस्ले, बीपीसीएल, इंडसइंड बँक, एनटीपीसी हे निफ्टीवर टॉप लूजसे होते.

साखर वधारल्याने 'या' कंपन्यांच्या शेअर्सची उसळी

जागतिक बाजारात साखरेच्या किमती वाढल्याने बुधवारी साखर कंपन्यांचे शेअर्स बीएसईवर वाढले. जागतिक बाजारात साखरेचे अर्थकारण वेगाने बदलत आहे. भारतासारख्या प्रमुख साखर उत्पादक देशामध्ये घटलेले उत्पादन आणि थायलंड, ब्राझीलमधील साखर उतरण्यास काही कालावधीची गरज, यामुळे जागतिक बाजारात साखर वधारली आहे. साखरेने प्रथमच टनाला ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर बजाज हिंदुस्तान शुगर, बलरामपूर चिनी मिल्स, डालमिया भारत शुगर एंड इंडस्ट्रीज, श्री रेणुका शुगर्स, उत्तम शूगर्स मिल्स, Dhampur Sugar Mills, Dwarikesh Sugar Industries, Magadh Sugar & Energy हे शेअर्स वाढले. हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्च तिमाहीचे निकाल आज जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसचा शेअर्स सपाट व्यवहार करत आहे. टाटा स्टील, एचडीएफसी, टेक महिंद्रा, अदानी ग्रीन, पंजाब नॅशनल बँक हे शेअर्स वाढले होते.

HFCL ला रिलायन्स प्रोजेक्टकडून १२४ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे HFCL शेअरने एनएसईवर ०.१६ टक्के वाढून ६३.२० रुपयांवर व्यवहार केला.

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात खरेदीवर जोर

आज बाजारात आठव्या सत्रातही तेजी राहिली. गेल्या काही सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर्सच्या खरेदीवर जोर दिसून आला. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, २८ मार्च ते १० एप्रिल दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सुमारे १ अब्ज डॉलरचे देशांतर्गत शेअर्सची खरेदी केली आहे. ११ एप्रिल रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३४२.८४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, असे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या आकडेवारीवरून दिसून आले. (Share Market Closing)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news