नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
वंदे मातरम् गीत हे केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगातील प्रत्येक नागरिकाला स्फूर्ती देणारे गीत आहे. मात्र, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांमुळे वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. मनमाड येथे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत 'वंदे मातरम्' या विषयावर ते बोलत होते.
शहरात गत 27 वर्षांपासून संस्कृती संवर्धन समितीतर्फे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. यात तीनदिवसीय मालिकेचे पहिले पुष्प अभिनेते पोंक्षे यांनी गुंफले.
अभिनेते पोंक्षे म्हणाले, बॅरिस्टर जिना धर्मनिरपेक्ष होते. त्यांचादेखील वंदे मातरम्ला विरोध नव्हता. वंदे मातरम् सुरू असताना कोणी उभे राहिले नाही, तर जिना त्याला उभे राहण्यास सांगायचे. मात्र, 1930 नंतर त्यांची भूमिका बदलली. जन गण मन हे गीत बंगालची फाळणी रद्द करणाऱ्या एका ब्रिटिश अधिका-याच्या स्वागतासाठी लिहिण्यात आले होते. एका साहित्य संमेलनात पु.ल. देशपांडे यांच्यासह इतरांनी वंदे मातरम् ला विरोध केला होता, असेही ते म्हणाले. हे गीत धर्मासाठी लिहिलेले नसून, समस्त पृथ्वीला माता म्हणून वंदन करणारे असल्याचे म्हटले. वंदे मातरम् हेच देशाचे राष्ट्रगीत होणार होते. मात्र, पहिले पंतप्रधान यांनी ते होऊ दिले नसल्याचेही ते म्हणाले. तसेच काँग्रेसची स्थापना एका ब्रिटिशाने केल्याचा दावादेखील पोंक्षे यांनी केला. यावेळी त्यांनी शहरातील पाणी समस्येबाबत बोलताना आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांमुळे मनमाडकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा उल्लेख केला.
यावेळी व्यासपीठावर प्रगती अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंगी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, अमृत परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दिलीप बेदमुथा, समितीचे अध्यक्ष प्रमोद आदी उपस्थित होते. महेश नावरकर यांनी स्वागत, तर योगेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल तावडे यांनी परिचय करून दिला. रमाकांत मंत्री, अभिजित रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.