Sharad Pawar on Democracy : लोकशाही वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार- शरद पवार

Sharad Pawar on Democracy
Sharad Pawar on Democracy

पुढारी ऑनलाईन डेस्क : "लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत", असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. ते जंतरमंतरवर याठिकाणी आयोजित आंदोलनात आज (दि.२२) बोलत होते. दिल्लीतील जंतरमंतर येथे लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसद घुसखोरी प्रकरणी १४६ विरोधी खासदारांच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान आजपासून देशभर लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन, निदर्शने होणार आहेत. (Sharad Pawar on Democracy)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ सदस्यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांकडून शुक्रवारपासून (दि.२२) देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन 'लोकशाही वाचवण्यासाठी' करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.

व्यासपीठावरील सर्वजण देशासाठी कोणतीही, कितीही किंमत मोजण्यास तयार

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, देशाच्या संसदेत अनेक लोक घुसले आणि तिथे जे काही घडले ते देशाच्या गृहमंत्र्यांनी देशवासीयांना आणि सदस्यांना सांगण्याची गरज आहे.देशाच्या विरोधी पक्षातील लोकांनीही तेच सांगितले. याची किंमत मोदी सरकारने 140 हून अधिक खासदारांना सभागृहाबाहेर ठेवून चुकवली. विरोधकांवर कारवाई केली तर देशातील विरोधकांचा आवाज आपण बंद करू शकतो, हे त्यांना समजते. मला एवढेच सांगायचे आहे की, आज व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर देशाच्या संसद आणि लोकशाहीसाठी कितीही किंमत मोजावी लागतील यासाठी मनापासून लढण्यास तयार आहेत.

आज देशातील कष्टकरी जनतेला किंमत मोजावी लागत आहे

संकट मोठे आहे, आज गावोगावी गेल्यावर या देशातील गरीब जनतेच्या उपासमारीचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर गेल्याचे आपण पाहिले आहे. कारखान्यात काम करणारा मजूर आज त्याच्या खऱ्या कष्टाची किंमत न मिळाल्याने दुःखी आहे. आपल्या देशात आदिवासी असो वा दलित गावात राहून आपले प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे दु:खी आहेत. हे सर्व सहन करण्यामागे श्रमजीवी जनतेचा एकच कारण आहे ते म्हणजे, 'भारतीय जनता पार्टी'. म्हणून आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि कठोर परिश्रम करून लोकशाहीवर आघात करणारी ही सामुदायिक शक्ती दूर करण्यासाठी आपण एकजूट राहू या, एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींचा माध्यमांवर निशाणा

जंतर-मंतरवर संसद भंगच्या निषेधार्थ बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, अचानक दोन- तीन तरुण संसदेत घुसले आणि त्यांनी धूराच्या नळकांड्या भिरकावल्या. यावेळी भाजप खासदार पळून गेले. या घटनेत सुरक्षा भंगाचा प्रश्न आहे, पण आणखी एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर म्हणजे देशातील बेरोजगारी आहे.  त्यामुळे या तरूणांनी असा विरोध केला असल्याचे मत राहुल यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच देशातील माध्यमांनी देशातील बेरोजगारीबद्दल बोलले नाही. परंतु संसदेबाहेर निलंबित खासदार बसलेले असताना, मी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याबद्दल बोलले, असा हल्लाबोल भारतातील माध्यमांवर केला आहे.

"१४० कोटी लोकांसाठी आम्ही लढू" -काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला

आम्ही देशातील १४० कोटी लोकांसाठी लढू, संसद आणि संसदीय प्रतिष्ठेसाठी लढू, संविधानासाठी लढू, असे  काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान बोलत होते. संसदेतील निलंबित खासदार आणि सरकारच्या धोरणाविरूद्ध विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून जतंरमंतरवर आंदोलन आणि निदर्शने सुरू आहे. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मत मांडले.

आमची फक्त निवेदनाची मागणी- खासदार दिग्विजय सिंह

आतापर्यंत एवढ्या खासदारांना कधी निलंबित करण्यात आले आहे का? आम्ही फक्त गृहमंत्र्यांकडे निवेदनाची मागणी केली होती, असे मत काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.

संसद सुरक्षा भंग घटनेसाठी भाजप जबाबदार- सीताराम येचुरी

"सध्या सत्तेत असलेल्यांपासून आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. संसदेत सुरक्षा भंगाच्या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले पाहिजे," असे मत सीपीआय (एम) नेते सीताराम येचुरी दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्षांच्या आंदोलनादरम्यान व्यक्त केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news