Sharad Pawar : शरद पवार दैवत; देवावर ती वेळ नको! मंत्री धनंजय मुंडे; यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोबाबत स्पष्टीकरण

Sharad Pawar : शरद पवार दैवत; देवावर ती वेळ नको! मंत्री धनंजय मुंडे; यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोबाबत स्पष्टीकरण

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांना आम्ही दैवत मानतो. मात्र, त्यांचे फोटो वापरले तर कायदेशीर कारवाई करेन, असे त्यांनी भक्तांना सांगितले आहे. आमच्या देवावर ही वेळ येऊू नये, यासाठी त्यांच्या ऐवजी त्यांचे गुरू असलेले यशवंतराव चव्हाण यांचे फोटो आम्ही लावले आहेत, अशी भूमिका कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली. नगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो हटवून, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो झळकत असल्याकडे लक्ष वेधले असता, कृषीमंत्री मुंडे म्हणाले, शरद पवार यांना आम्ही दैवत मानतो.

त्या देवानेच आम्हाला सांगितले की, माझा फोटो टाकायचा नाही. तुम्ही जर फोटो टाकला तर कायदेशीर कारवाई करेन. अशावेळी आम्ही काय करायचे. कायदेशीर कारवाई करतो, असे ज्यावेळी देवच म्हणतो, ती वेळ आमच्या देवावर येऊ नये, म्हणून त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरू मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांचा आम्ही फोटो लावला, अशी बाजू त्यांनी मांडली.

तसेच, ज्या ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टी झाली आहे किंवा सलग 21 दिवस पावसाचा खंड आहे, अशा मंडलांतील शेतकर्‍यांना पीकविम्याची 25 टक्के अग्रीम भरपाई दिवाळीच्या आत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्याबाबत मंत्री मुंडे म्हणाले, कांद्याला 2410 रूपये या सरकारने ऐतिहासिक भाव दिला. कालच पियुष गोयल यांच्यासमवेत अजित पवार यांची बैठक झाली आहे. त्या बैठकीला मीही उपस्थित होतो. त्यावेळी गोयलांनी अधिकचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि तोही 2150 रुपयांनी घेण्याचा निर्णय झाला आहे. तरीही केवळ विरोधाला विरोध करून राजकारण करायचे, हे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news