Ayushman card : पुणे जिल्ह्यातील 25 टक्के लाभार्थ्यांकडेच आयुष्यमान कार्ड | पुढारी

Ayushman card : पुणे जिल्ह्यातील 25 टक्के लाभार्थ्यांकडेच आयुष्यमान कार्ड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत उपचार मोफत होत आहेत. मात्र, त्यासाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढणे आवश्यक आहे. मात्र, याला अल्प प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात 16 लाख 88 हजार 687 लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ 4 लाख 26 हजार 373 लाभार्थ्यांनी कार्ड काढले आहे.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून, 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत एकत्रितरीत्या सुरू करण्यात आली आहे. सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत अंगिकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रतिकुटुंब प्रतिपॉलिसी प्रति वर्षी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येत आहे. 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार समाविष्ट असून  पुणे जिल्ह्यात 57 खासगी व 12 शासकीय अशा एकूण 69 रुग्णालयांचा समावेश आहे.
जनगणना 2011 यादीतील आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागा1 लाख 79 हजार 395 कुटुंबे आणि शहरी भागात 2 लाख 77 हजार 633 कुटुंबे अशी 4 लाख 57 हजार 28 कुटुंबे या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. जिल्ह्यात या योजनेचे एकूण पात्र लाभार्थी 16 लाख 88 हजार 687 असताना आतापर्यंत केवळ 4 लाख 26 हजार 373 लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे.

या लिंकवर काढू शकता कार्ड

गोल्डन कार्ड काढण्यासाठी https:// beneficiary. nha. gov. in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात 1 हजार 199 आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येतील. https:// aapkedwarayushman. pmjay. gov. in/ AapkeDwar या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.
हेही वाचा

Back to top button