नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटासोबत निघून गेले. उर्वरित पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत शरद पवार यांनी पक्षबांधणीची मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील उर्वरित पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये शरद पवार यांनी वन टू वन चर्चा करत जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच लवकरच जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
येवला येथील सभेनंतर शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देत आहेत. नेते, कार्यकर्ते यांची झालेली पडझड थांबविण्यासाठी तसेच नवी बांधणी करण्यासाठी शरद पवारांनी काम सुरू केले आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात पार पडली. या सभेत शरद पवार यांनी बंडखोरांना इशारा देताना, शरद पवार गटाचे पुढचे मार्गक्रमण कसे असणार आहे, याचे थेट संकेत दिले. या सभेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते.
येवला येथील सभेनंतर शरद पवार गटासोबत मतदारसंघातील जुने जाणते लोक असल्याचे दिसून आले. याच लोकांना आता मुंबईमध्ये बोलावून त्यांच्याशी वन टू वन चर्चा केली जात आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासोबत राहून पक्षाची पुनर्बांधणी करा, असे आवाहन शरद पवारांकडून करण्यात आले आहे. दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले आहेत, याचा आढावा पवार घेत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यात नव्या नियुक्त्या होण्याची माहितीदेखील मिळत आहे.
वन टू वन चर्चा, आज कार्यकर्त्यांची सभा
साहेबांनी सांगितल्यानुसार सोबत असलेल्यांची नावे सुचवली होती. त्यांच्याशी साहेबांनी वन टू वन चर्चा केली. त्यांना पक्षबांधणीसाठी तयारी करण्याच्या सूचना साहेबांनी दिल्या आहेत. आजपासून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांची सभा ठेवली आहे. त्यानंतर सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे. कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती आहे, याबाबत माहिती घेऊन पक्षबांधणी जोमाने करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचा :