Sharad Mohol : मुळशी पॅटर्नचा प्यादा!

Sharad Mohol : मुळशी पॅटर्नचा प्यादा!
Published on
Updated on

खास प्रतिनिधी, पुणे : नव्वदच्या दशकात पुण्यात आयटी हब उभारणीच्या प्रारंभापासून संघटित गुन्हेगारीची 2005 साली सुरुवात झाली. गुन्हेगारी आणि जमिनी खरेदी-विक्री व्यवहारांच्या वर्चस्ववादातून 2005 साली मारणे टोळीतील अनिल मारणे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. त्याच टोळीतील रसाळचा 2006 मध्ये खून झाला. या दोन्ही खुनाच्या प्रकरणांत संदीप मोहोळ याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दोघांचे खून झाल्याने मारणे टोळीही संदीप मोहोळच्या मागे लागली होती. एकेदिवशी संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरुडकडे जात असताना मारणे टोळीने गोळ्या घालून त्याचा मुडदा पाडला. (Sharad Mohol)

मोहोळच्या खूनप्रकरणी गणेश मारणे कारागृहात गेल्यानंतर टोळीची सूत्रे किशोर मारणे याच्याकडे गेली. संदीप मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळीतील गुन्हेगारांनी किशोर मारणेचा नीलायम टॉकीजजवळ खून केला. शरद मोहोळ हाच या खुनाचा मुख्य सूत्रधार होता. याप्रकरणी शरद मोहोळसह सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. शरद मुळातच सणकू डोक्याचा होता, त्यामुळे तो येरवडा कारागृहात असतानासुद्धा त्याने मोठे कांड केले. संशयित दहशतवादी म्हणून पकडलेल्या कतिल सिद्दिकीचा त्याने गळा आवळून खून केला; मात्र दोन वर्षांपूर्वी त्याला न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले होते. मारणेच्या खुनाच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयात शरदला जामीन मंजूर झाला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय नेत्यांशी जवळीक निर्माण करीत होता.

दरम्यानच्या काळात नामदेव कानुगडे (मामा) आणि शरद मोहोळमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. मामा कानुगडेची गँग सतत शरदच्या मागावर होती; मात्र मोका मिळत नव्हता. त्यामुळे मामा कानुगडेचा भाचा मुन्ना पोळेकर याने थेट शरदच्या टोळीत शिरूनच त्याची गेम करण्याचा प्लॅन रचला. त्यासाठी मुन्ना आणि त्याच्या चार-दोन साथीदारांनी शरदच्या टोळीत प्रवेश केला. मामा गँगमधील या पोरांवर शरदचा सुरुवातीपासून विश्वासच नव्हता; पण हळूहळू मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी शरदचा विश्वास संपादन केला. त्यांच्या डोक्यात सतत शरदची सुपारी वाजवायचा बेत घोळत होताच. शरदला मात्र या कटाची कानोकान खबर नव्हती. त्यामुळे शरद मुन्नाला नेहमी बॉडीगार्डप्रमाणे सोबत बाळगत होता. हाच बॉडीगार्ड एक दिवस आपलीच बॉडी गार करणार असल्याची शरदला कधी शंकासुद्धा आली नव्हती; पण मुन्नाने मात्र मामा कानुगडेसाठी काहीही करण्याची तयारी करूनच ठेवली होती.

अखेर मोका साधलाच!

शरद मोहोळच्या खुनाच्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरदकडे त्याच्या चेल्याचपाट्यांची वर्दळ होती, जेवणखाण सुरू होते. मुन्नाही यामध्ये सहभागी होताच. दुपारी एकच्या सुमारास मुन्ना आणि शरदने घरी एकत्रच जेवण केले आणि देवदर्शनाला म्हणून शरद मुन्नासोबत बाहेर पडून जवळच असलेल्या त्याच्या कार्यालयाकडे निघाला. त्यावेळी शरदच्या नेहमीच्या साथीदारांची वर्दळही बरीच कमी झाली होती. हा मोका हेरून मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी मागून-पुढून त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडून त्याचा मुडदा पाडला आणि मुळशी पॅटर्नचा आणखी एक प्यादा पटावरून गायब झाला.

पुन्हा गँगवॉरची चाहूल!

मागील काही वर्षांत पोलिसांनी राबविलेल्या कडक धोरणांमुळे बरेच गुंड कारागृहात, तर काही गुंड अंडरग्राऊंड झाले होते. मागील तीन वर्षांत पुण्यातील तब्बल 200 हून अधिक टोळ्यांना मोक्का लावल्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचे जणूकाही कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे मागील काही वर्षे टोळ्याटोळ्यांमधील रक्तचरित्राला ब्रेक लागला होता; मात्र शरद मोहोळच्या खुनामुळे टोळ्यांमधील संघर्षाला या निमित्ताने खतपाणी तर मिळाले नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मुळशीत गोळीबाराचा सराव!

शरद मोहोळला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून तीन पिस्तुले आणि अकरा काडतुसे खरेदी केली. शरदचा अचूक वेध घेता यावा म्हणून पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले. त्यामुळे शरद मोहोळच्या खुनाच्या पाठीमागे इतर कोणत्या टोळीचा हात आहे का, हेदेखील पोलिस पडताळून पाहत आहेत.

शरद मोहोळचे गुन्हेगारी रेकॉर्ड

  • कोथरुड पोलिस ठाणे 525/04 भादंवि कलम 324, 504, 427 (निर्दोष)
  • डेक्कन पोलिस ठाणे 683/07 भादंवि कलम 395, 397, 384, 34 (निर्दोष)
  • पौड पोलिस ठाणे 187/08 भादंवि कलम 394, 34, 68/09 भादंवि कलम 394, 34
  • पौड पोलिस ठाणे 77/11 भादंवि कलम 364-अ, 34, 90/11 भादंवि कलम 384, 385, 34
  • दत्तवाडी पोलिस ठाणे 3147/09 भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट 3, 4 (25), 9/10 भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट 3, 4 (25)17 जून 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा
  • कोथरुड पोलिस ठाणे 434/09 भादंवि कलम 324, 34 (निर्दोष)
  • खडकी पोलिस ठाणे 3013/12 आर्म अ‍ॅक्ट 3 (25) 120 ब इतर (न्यायप्रविष्ट)
  • वारजे माळवाडी पोलिस ठाणे 33711 भादंवि कलम 395, 364, 120 ब, 342, 387, मोक्का
    येरवडा भादंवि कलम 302, 201, 34,
  • खडक पोलिस ठाणे 115/15 भादंवि कलम 387, 109, 34 मोक्का (निर्दोष)

गँगस्टरचे नाव चर्चेत!

मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचे नाव घेतले व आम्ही त्यांची पोरं असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शरद मोहोळ याचा खून टोळीयुद्धाच्या संघर्षातून तर झाला नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुन्नाने शरद मोहोळचा खून केल्याचा दावा केला आहे. आता एका गँगस्टरचे नाव पुढे आले असले तरी शरदची गेम नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, त्याद़ृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news