क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील संशयित आरोपी आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून शनिवारी सुटका झाली. आर्यनला गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण जामिनासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी त्याला कारागृहात रहावे लागले होते. जामीन देताना न्या. नितीन सांब्रे यांनी १२ अटी घातल्या आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता न्यायालयाच्या जामीन आदेशाची प्रत हाती पडली. आर्यनसह तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे एक किंवा अधिक जामीनदार देण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर झाला. विशेष म्हणजे शाहरुख खानची मैत्रीण आणि एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने आर्यन खानसाठी एक लाखाची व्यक्तिगत हमी दिली. एकत्र चित्रपट, आयपीएल आणि आता आर्यनची जामिनदार बनल्यामुळे जुही आणि शाहरुखची मैत्री अधिकच मजबूत झाली आहे.
शाहरुखची जुही सोबत घट्ट मैत्री आहे. जुहीने शाहरुखशी संबंधित एक किस्सा एका मुलाखतीदरम्यान शेअर केला होता. जुहीने म्हटले होते की जेव्हा पाठोपाठ माझे चित्रपट हिट झाले तेव्हा माझ्या मनात अहंकार येऊ लागला. तेव्हा मला वाटू लागले होते की मी सर्वकाही आहे. डर चित्रपटाच्या सेटवर तिच्यातील हा अहंकार दिसून आला होता. सेटवर सर्वांसमोर जुही आणि तिच्या आईमध्ये वाद झाला होता. त्यानंतर शाहरुखने तिला समजावत आई-वडिलांसोबत चांगल्या पद्धतीने बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी शाहरुखने म्हटलेले शब्द माझ्या अजूनही आठवणीत आहेत. दोस्तीचा अर्थ केवळ एकमेकांच्या सुख दुखःत सहभागी होणे असा नाही. पण मित्राचे गुण-दोष दाखवत त्याला खडसावणे ही देखील एका मित्राची जबाबदारी आहे.
जुहीने एकदा शाहरुख सोबत असलेल्या मैत्रीबाबत म्हटले होते की आम्ही दोघांनी करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. माझ्यानंतर २-३ वर्षानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये आला होता. त्यानंतर आम्ही को-स्टार म्हणून एकत्र काम केले. प्रॉडक्शन कामामधून आम्ही एकमेकांशी जोडलो. ज्यात आम्हाला अपयश आले. अपयश पचवणे खूप कठीण असते. जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा सर्वांना चांगले वाटते. आम्ही दोघांनी मिळून अपयशाचा सामना केला आणि त्यातून बाहेर पडत उभारी घेतली. आम्ही आमच्या जीवनात प्रत्येक स्थितीचा सामना केला. अशा परिस्थितीत काही लोक आपल्यासोबत कायम राहतात. त्यापैकी एक म्हणजे शाहरुख. जे अडचणीच्या काळात आपल्या सोबत राहतात. ते कधीही तुमची साथ सोडणार नाहीत.
याआधी शाहरुख आणि जुहीच्या अफेयरच्या चर्चा झाल्या. यामुळे शाहरुखने जुही सोबत फिल्म साइन न करण्याचा निर्णय घेतला होता. शाहरुखने दोघांची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पडद्यावर दोघे एकत्र दिसू नयेत ही काळजी शाहरुखने घेतली.
शाहरुख आणि जुहीने दोघांनी मिळून अनेक चित्रपट केले. या दोघांचा 'राजू बन गया जेंटलमैन' हा पहिला चित्रपट होता. 'राम जाने', 'यस बॉस', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' सारखे हिट चित्रपट दोघांनी दिले. त्यानंतर दोघे बिझनेस पार्टनर बनले. २००८ मध्ये आयपीएल टीम 'कोलकाता नाइट राइडर्स'ची मालकी मिळवली.