पुढारी ऑनलाइन डेस्क : Senthil Balaji : तामिळनाडूचे वीज मंत्री सेंथिल बालाजी यांच्या बडतर्फीच्या आदेशाला राज्यपाल आर.एन. रवी यांनी स्थगिती दिली आहे. याबाबत ते अॅटॉर्नी जनरलकडून कायदेशीर सल्ला घेणार आहेत. याविषयीचे पत्र त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांना पाठवले आहे. बालाजी यांच्या बडतर्फीच्या आदेशाने तामिळनाडूचे राजकारण काल चांगलेच तापले होते. राज्यपालांच्या या निर्णयाला मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी कायदेशीर आव्हान देणार असल्याचे म्हटले होते.
आर्थिक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे व्ही. सेंथिल बालाजी यांना तमिळनाडूच्या राज्यपालांनी गुरुवारी (29 जून) सकाळी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्याचे आदेश दिले होते. तमिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी कारवाई सुरु आहे. यामध्ये नोकरीच्या बदल्यात पैसे घेणे आणि मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर आहेत. आज (दि. २९) तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी बालाजी यांना आज मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्याचे जाहीर केले आहे. राज्यपालांनी दिलेल्या निर्णयानंतर सीएम स्टॅलिन संतापले होते.
बुधवारी (दि. २८) चेन्नई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. अली यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी हा निर्णय दिला होता. त्यामुळे आता सेंथिल बालाजी यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
मात्र, राज्यपालांनी लगेचच घुमजाव करत आपल्याच आदेशाला स्थगिती दिली. यासंदर्भात राज्यपालांनी संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना पत्रही पाठवले आहे. याबाबत आपण अॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ऍटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत घेणार आहे.