पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत आणि आयटी शेअर्समधील जबरदस्त तेजीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सोमवारी नवे शिखर गाठले. सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ७३,२५० पार झाला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २२ हजारांचा टप्पा ओलांडला. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा उच्चांक आहे. (Sensex- Nifty)
आयटी शेअर्समधील तेजीमुळे शेअर बाजाराला नवे शिखर गाठण्यास मदत झाली. विशेषतः एचसीएलटेक आणि विप्रोच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे आयटी शेअर्समध्ये तेजीचा माहौल पाहायला मिळत आहे. यामुळे निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २२ हजारांचा आणि सेन्सेक्सने ७३ हजारांचा टप्पा ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला.ॉ
संबंधित बातम्या
सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर १० टक्क्यांनी वाढून ५१३ रुपयांवर व्यवहार करत आहे. टेक महिंद्राचा शेअर ५ टक्क्यांनी वाढून १,३८२ रुपयांवर गेला. एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, एशबीआय, एचडीएफसी बँक हे शेअर्सही जबरदस्त तेजीत आहेत. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे.
एनएसई निफ्टीवर विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, LTIMINDTREE, इन्फोसिस हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर एचडीएफसी लाईफ, आयशर मोटर्स, टाटा कन्झ्युमर हे टॉप लूजर्स आहेत.
निफ्टी आयटी आज सुमारे ३ टक्क्यांनी वाढला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रियल्टीदेखील अनुक्रमे १.७ टक्के आणि १ टक्क्यांनी वाढले.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील (Q3FY24) कमाईच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे आयटी शेअर्स जबरदस्त तेजीत आहेत. ही तेजी पुढेही वाढेल अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अडखळत्या सुरुवातीनंतर सोमवारी आशियाई बाजार वधारले. जपानचा निक्केई निर्देशांक १.२ टक्क्यांनी वाढून ३४ वर्षांच्या नव्या शिखरावर पोहोचला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.३६ टक्क्यांनी वाढला, तर हाँगकाँगचा हँग सेंग ०.११ टक्क्यांनी वाढला.
जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ३,८६४ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले आहेत. तर, परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) ने गेल्या शुक्रवारी ३४० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,९११ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.