Stock Market Closing Bell | ‘सेन्सेक्स’चा डबल धमाका! ‘निफ्टी’ही नव्या शिखरावर, तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेत तसेच आयटी आणि ऑटो शेअर्समधील खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारातील तेजीचा वारू सोमवारी (दि.८) जोरदार उधळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७४,८६९ च्या तर निफ्टीने २२,६९७ च्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर सेन्सेक्स ४९४ अंकांच्या वाढीसह ७४,७४२ वर स्थिरावला. तर निफ्टी १५२ अंकांनी वाढून २२,६६६ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर सर्वाधिक तेजी एनर्जी, रियल्टी आणि मेटल निर्देशांकांत राहिली. ऑईल आणि गॅस तसेच रियल्टी सुमारे १ टक्क्याने वाढले. ऑटो आणि आयटी निर्देशांकातही खरेदी दिसून आली. बँक निफ्टीनेही आज नवा उच्चांक गाठला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांना १.५५ लाख कोटींचा फायदा, बाजार भांडवल ४०० लाख कोटी पार

बाजारातील तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८ एप्रिल रोजी १.५५ लाख कोटींनी वाढून ४००.८६ लाख कोटींवर पोहोचले. बीएसई बाजार भांडवल ४०० लाख कोटींवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. ५ एप्रिल रोजी एकत्रित बाजार भांडवल ३९९.३१ लाख कोटी होते. आज ८ एप्रिल रोजी त्यात १.५५ लाख कोटींची वाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे बीएसई बाजार भांडवलात केवळ ९ महिन्यांत १०० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मार्च २०१४ मध्ये बीएसई कंपन्यांचे बाजार भांडवल १०० लाख कोटी रुपयांवर होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ते २०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जुलै २०२३ मध्ये ते ३०० लाख कोटींवर गेले आणि आता केवळ नऊ महिन्यांनंतर बाजार भांडवलाने ४०० लाख कोटींचा टप्पा पार केला.

कोणते शेअर्स सर्वाधिक तेजीत?

सेन्सेक्स आज ७४,५५५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७४,८६९ च्या उच्चांकावर गेला. सेन्सेक्सवर मारुती, एम अँड एम हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, रिलायन्स, ॲक्सिस बँक, एलटी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, भारती एअरटेल हे शेअर्सही १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर नेस्ले इंडिया, विप्रो, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

निफ्टीने आज २२,६९७ अंकाला स्पर्श करत सर्वकालीन उच्चांक नोंदवला. निफ्टीवर आयशर मोटर्सचा शेअर्स टॉप गेनर राहिला हा शेअर्स ४,३०० रुपयांपर्यंत वाढला. त्यानंतर हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून ४,२०० रुपयांवर स्थिरावला. मारुती, एम अँड एम, एसबीआय लाईफ, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. दरम्यान, अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, विप्रो हे शेअर्स टॉपू लूजर्स ठरले. विप्रोचा शेअर्स १ टक्के घसरून ४७९ रुपयांपर्यंत खाली आला.

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत

मार्चमध्ये अमेरिकेत सुमारे ३ लाख नोकऱ्या निर्माण झाल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली आहे. गेल्या शुक्रवारी नॅस्डॅक (Nasdaq) आणि एस अँड पी (S&P500) निर्देशांक सुमारे १ टक्क्यानी वाढून बंद झाला होता. त्याचे सकारात्मक परिणाम आज हाँगकाँग, टोकियो, सिडनी, सेऊल, सिंगापूर आणि तैपेई येथील आशियाई बाजारांत दिसून आले. एकूणच आशियाई बाजारात आज तेजी राहिली.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. सोमवारी तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १ डॉलरहून अधिक घट झाली. यामुळे ब्रेंट क्रूड ९० डॉलरच्या खाली आले. कारण इस्रायलने दक्षिण गाझामधून आणखी सैनिक मागे घेतल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला आहे. यामुळे ब्रेंट क्रूड फ्युचर्स १.४८ डॉलरने म्हणजे १.६ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल ८९.६९ डॉलरवर आले. (Crude oil prices)

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर

गेल्या शुक्रवारी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला होता तर परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले होते. या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,६५९.२७ रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,३७०.४२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. (Stock Market Closing Bell)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news