पुणे : शाळेत जाणाऱ्या मुलीला डंपरने चिरडले; संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला

संतप्त गावकऱ्यांनी पेटवलेल्या हायवा ट्रकची अवस्था
संतप्त गावकऱ्यांनी पेटवलेल्या हायवा ट्रकची अवस्था

इंदापुर, पुढारी वृत्तसेवा : माल वाहतूक करणाऱ्या डंपरने 13 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात वडापुरी रोडवरती छोट्याकालव्या नजीक शुक्रवारी (दि.29) घडली. तृप्ती नाना कदम असे मृत मुलीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टिपर पेटवला.

या अपघातात बाबत मिळालेली माहिती अशी की, (काटी, तालुका इंदापूर) येथे नानासाहेब कदम हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एम .एच. ४२ ए. व्ही. ३७६४) कृष्णा (वय ११) व तृप्ती (वय १३) या आपल्या  मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्ते बांधकामावरील खडीने भरलेला हायवा वाहन (क्रमांक एम. एच. ४२ टी१६५३) ने बुलेट दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या तृप्ती ही मागील चाकाखाली आल्याने जागीच मरण पावली. या घटनेत नानासाहेब कदम व त्यांचा मुलगा कृष्णा नानासाहेब कदम हे जखमी झाले.

या हृदयद्रावक घटनेनंतर गावातील संतप्त जमावाने हायवा ट्रक पेटवून दिला. अग्निशामक दलाच्या मदतीने या हायवाची आग विझवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद महादेव जवरे (वय 40 रा.खैरा जि. यवतमाळ) यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news