पुढारी ऑनलाईन: हवाई दलासाठी शनिवार ( दि. २८) अपघातवार ठरला. मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांत दोन दुर्घटना घडल्या. मध्य प्रदेशमधील मुरेनाजवळ दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. तर राजस्थानातील भरतपूर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; अशी माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली आहे.
मध्यप्रदेशातील मुरेनाजवळ हवाई दलाची सुखोई-३० आणि मिराज २००० या विमानांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही विमाने कोसळली. हवाई सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. याबद्दल शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही विमाने क्रॅश होऊन, दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडल्याची भीती आहे. अपघाताच्या वेळी सुखोई-३० मध्ये 2 पायलट, तर मिराज २००० मध्ये एक पायलट होता. सुरुवातीच्या अहवालानुसार २ पायलट सुरक्षित असून,अजून एका पायलटचा शोध सुरू असल्याची माहिती मुरेन जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजस्थानमधील भरतपूर येथे आज सकाळी हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. भरतपूरच्या उचैन पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगोरा गावाजवळ विमान कोसळले. येथील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या या लढाऊ फायटर विमानाला हवेतच आग लागली असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. या घटनेच्या माहितीनंतर हवाई दलाच्या अधिकार्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, विमानात किती पायलट होते किंवा किती जीवित व वित्तहानी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सविस्तर तपशील लवकर दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलांच्या प्रमुखांकडून भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या अपघाताबाबत माहिती घेतली आहे. रक्षा मंत्री यांनी आयएएफ वैमानिकांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सीडीएस जनरल अनिल चौहान आणि आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या संपर्कात असून हे दोन्ही प्रमुख घटनेचा तपशिल घेत असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.