सातारा : महाबळेश्वरचा वेण्णा तलाव भरला; पावसाळी पर्यटनासाठी गर्दी

महाबळेश्चरचा वेण्णा तलाव भरला
महाबळेश्चरचा वेण्णा तलाव भरला
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा पावसाचे माहेरघर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या पंधरा वीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने आज (शनिवार) पहाटे भरला. यामुळे या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

महाबळेश्वर अन् पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे, याचा प्रत्यय गेले काही दिवस धुवाधार बरसणाऱ्या पावसाने येत आहे. शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. कोसळणाऱ्या या पावसाने जनजीवन विस्खळीत झाले आहे. जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. बिपर जॉय चक्रीवादळाचा काहीसा प्रभाव पाहावयास मिळाला, परंतु पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. मात्र जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यानंतर खऱ्याअर्थाने शहर परिसरात धुवाधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जून महिन्यामध्ये एकूण तीस इंच पावसाची नोंद झाली होती.

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद यंदाच्या जून महिन्यात झाल्याचे पाहावयास मिळाले. जुलै महिन्याच्या प्रारंभी पासूनच जोरदार वाऱ्यासह दाट धुके व पावसाची संततधार सुरु होती. महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. आज शनिवारी पहाटे वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णा तलावातून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वरात पावसाने पन्नास इंचाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होतो असा इतिहास आहे.

वेण्णालेक परिसरात पर्यटकांनी अशा धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेकजण दाट धुक्यात सेल्फी घेताना पहावयास मिळाले, तर अनेक हौशी पर्यटकांनी घोडे सवारीचा आनंद घेतला. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत कपडे व्यावसायिक, चप्पल व्यापाऱ्यांनी "सेल" लावल्याने "सेल"साठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. उबदार कपडे, शाल, मफलर, ब्लँकेट्स घेण्यासह रेनकोट छत्री दुकानांकडे देखील गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. ०१ जून ते ०८ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत १३०१.० मिमी (५१.२२ इंच) पावसाची नोंद झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news