ह्रदय प्रत्यारोपण परवानगीची ‘ससून’ला प्रतीक्षा ; राज्यात 108 जण वेटिंगवर

हृदय heart Doctor Health
हृदय heart Doctor Health
Published on
Updated on

पुणे : राज्यात हृदय प्रत्यारोपणासाठी सध्या 108 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून गेली तीन वर्षे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणाची परवानगी मिळालेली नाही. यकृत प्रत्यारोपणासाठीचा नूतनीकरण परवानाही लाल फितीत अडकला आहे. हृदय, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या असतात. त्यासाठी सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असते. ससूनमध्येही हीच स्थिती आहे. मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाच्या गेल्या पाच वर्षांमध्ये केवळ 10 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर, हृदय प्रत्यारोपण परवानगीच्या निकषांमध्ये त्रुटी आढळल्याने कोरोना साथीपूर्वी पाठविलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.

यकृत प्रत्यारोपणाच्या परवान्याचे नूतनीकरण गेले सहा महिने झालेले नाही. त्यामुळे ससूनमध्ये 15, तर राज्यात 1238 रुग्ण प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत. हृदय प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आवश्यक असते. त्या उभारणीसाठी आधी परवानगी मिळाल्यास शासनाकडून निधी मिळविणे शक्य होईल, असे ससून प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सर्व तयारी आधी पूर्ण करावी, अशी आरोग्य संचालनालयाची अपेक्षा आहे. मात्र, राज्यात मुंबईनंतर पुण्यामध्येच हृदयरोगांवरील अत्याधुनिक उपचारांची सोय आहे. त्यामुळे पुण्यात हृदय प्रत्यारोपणाला प्रारंभ झाल्यास त्याचा अनेक रुग्णांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण लाल फितीत न अडकवता चर्चेतून मार्ग काढावा, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

ससूनतर्फे तीन वर्षांपूर्वी आरोग्य संचालनालयाकडे हृदय प्रत्यारोपणासाठी परवानगीचा प्रस्ताव पाठविला होता. अग्निरोधक यंत्रणा, दोन स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, अशा काही तांत्रिक त्रुटी कळविण्यात आल्या होत्या. त्यानंतर कार्डिऑलॉजी विभाग नवीन 11 मजली इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडे मागणी करण्यात आली. हृदय प्रत्यारोपणाला परवानगी मिळाल्यास आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उभ्या करता येऊ शकतात.
             – डॉ. नित्यानंद ठाकूर मानद पथकप्रमुख, कार्डिओथोरॅसिक सर्जरी

यकृत प्रत्यारोपणाच्या परवाना नूतनीकरणासाठी तपासणी समितीने
जुलै महिन्यात ससूनला भेट दिली. महिनाभरात परवाना नूतनीकरणाची अपेक्षा आहे. हृदय प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठीही पाठपुरावा
केला जाईल.
                    – डॉ. संजीव ठाकूर अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

ससूनतर्फे परवानगीसाठी अर्ज आल्यानंतर त्यातील त्रुटी कळविण्यात आल्या. त्रुटी सुधारल्याबाबत ससून प्रशासन अधिक माहिती देऊ शकेल. यापूर्वी नागपूर एम्स रुग्णालयाला परवानगी देण्यात आली आहे. तर, केईएममधील प्रत्यारोपण परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.
– डॉ. अरुण यादव, माजी संचालक, आरोग्य संचालनालय (प्रत्यारोपण परवानगी विभाग)

हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक निकष
दोन सुसज्ज ऑपरेशन थिएटर
सुसज्ज रक्तपेढी
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
कार्डिअ‍ॅक सुविधा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news