पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच 'शिवसेना' हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले असल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भाने आज (दि.१९) सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut Tweet)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. नुकतचं निवडणूक आयोगाने त्या संदर्भात निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. काल (दि.१८) माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधळा.
देशातील सर्व विरोधीपक्षातील विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे, "राजकीय पक्ष म्हणजे कय?" तुमची व्याख्या काय आहे राजकीय पक्षाची? एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे, घटनेनुसार चालत आला आहे. त्या पक्षातील काही आमदार आणि खासदार आमिषाला बळी पडून बाहेर गेले म्हणून तो पक्ष, चिन्ह त्यांच्या मालकीचा कसा काय होऊ शकतो? हे प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ या लोकशाहीमध्ये आली आहे. हा निर्णय लोकभावना, कायदा पायदळी तुडवून निर्णय घेतला आहे. मुळात पक्ष हा जागेवरचं आहे. तो कुठेही गेलेला नाही. लोकांच्या भावना आमच्यासोबत आहेत. शिवसेनेची लाखोची संपत्ती म्हणजे हजारो शिवसैनिक ते आमच्यासोबत राहतील. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी आपल्या अधिकृ ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो शेअर करत हे ट्विट केलं आहे. या फोटोवर लिहलं आहे की, "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटलं आहे की,"माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेना चिन्ह आणि नाव विकत घेण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा व्यवहार करण्यात आला आहे. आमदारांसाठी ५० लाखांचे डील, तर मग पक्षासाठी किती मोठी डील झाली असेल ?, असा सवाल करून हे खोक्यांचे सरकार आहे. मी खात्रीपूर्ण सांगतो की आतापर्यंत २ हजार कोटी रूपये खर्च केले आहेत, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. छत्रपती शिवराय नेहमीच गद्दारांविरोधात लढले. शिवाजी महाराज सर्वसामान्यांचे राजे होते. मावळ्यांनी निर्माण केलेले राज्य होते. या नव्या सरकारने जनतेला शिवरायांपासून तोडण्याचा प्रयत्न केला. जर शिवनेरीवर सामान्यांना जाऊ दिले जात नसेल. तर तिथे दिल्लीश्वर तेथे जाऊन दुकान उघडणार आहेत का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
हेही वाचा