Sangli crime : सांगलीत धूम स्टाईल टोळीचा धुमाकूळ

file photo
file photo

सांगली : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून येऊन धूम स्टाईलने चोरी करणार्‍या टोळीने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. (Sangli crime)

सांगली आणि सांगलीवाडी येथे चार ठिकाणी चौघांचे मोबाईल हिसडा मारून घेऊन ते पसार झाले. त्यात एकाने मोबाईल देण्यास विरोध केल्याने झालेल्या झटापटीत तो जखमी झाला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, सांगलीत गेल्या काही दिवसांत धूम स्टाईलने मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
दुचाकीवरून येऊन दागिने हिसडा मारून पळवणे, मोबाईल पळवणे या पद्धतीच्या गुन्ह्याचे प्रमाण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यात काही जखमीही झाले. त्या पद्धतीचे गुन्हे पुन्हा वाढत असताना दिसत आहेत.बुधवारी एका दिवसात या प्रकारच्या चार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

sangali crime : सांगलीवाडीतील महाविद्यालयासमोरून निघालेल्या तरूणीच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केला. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. ऋतुजा रामचंद्र साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.
बायपास रस्त्यावरुन निघालेल्या मनिषा राजाराम हसबे यांचाही मोबाईल चोरट्यांनी याच पद्धतीने चोरून नेला.

त्याशिवाय बायपास रस्त्यालाच रात्रीच्यावेळी उमरफारुख शहाजन शेख (रा. शालिनीनगर) या तरुणाचा मोबाईल रात्री दहाच्या सुमारास याच पद्धतीने लंपास करण्यात आला. येथील कॉलेज कॉर्नर परिसरात अभिषेक जयसिंग पाटील (रा. वारणाली ) यांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून काढून घेतला. त्यावेळी झालेल्या झटापटीत पाटील हे जखमी झाले. अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर
धूम स्टाईलने चोरी करणारे दोन तरुण असून, त्यांनी विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर केला असल्याचे दिसत आहे. तोंडाला रूमाल बांधून ते फिरत असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news