श्रीरामपुरात वाळू तस्करांचा महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न

श्रीरामपुरात वाळू तस्करांचा महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्कारांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल-पोलिस पथकांवर वाहने घालत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानंतर तस्कर पसार झाले. श्रीरामपूर तालुक्यातील तालुक्यातील सरला गोर्वधन परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. जिल्हा गौण खनिज अधिकारी वसिम सय्यद, रॉयल्टी निरीक्षक कुलथे व पोलिस मुख्यालयाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बारवकर, गणेश शिंदे यांचे पथक सरला परिसरात छापेमारीसाठी पोहचले. छापेमारीसाठी सरकारी वाहन न वापरता खासगी मालवाहतूक टेम्पोचा वापर पथकाने केला.

मालवाहतूक टेम्पो पाहून तोही वाळू भरण्यासाठी आल्याचा तस्करांचा समज झाला. त्यामुळे या टेम्पोकडे तस्करांनी दुर्लक्ष केले. टेम्पो नदीपात्रात पोहचताच पथकातील सय्यद सहकार्‍यांसह नदीपात्रात उतरले. त्यांना पाहताचा वाळू तस्करांची पळताभुई झाली. अनेकांनी वाळूची वाहने याच ठिकाणी सोडून पळ काढला. सरला गोवर्धन परिसरात महसूल तसेच तालुका पोलिस कारवाईसाठी गेले असता या ठिकाणी असलेल्या एका डंपर चालकाने इतरांना चिथावणी दिली. त्यामुळे एकाने महसूल व पोलिसांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला.

पोहेकॉ. बारवकर यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे तस्कर वाहने तेथेच सोडून पळाले. याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तस्करी करणारी वाहने महसूल कार्यालयात आणण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यास अडथळा निर्माण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू तस्करीला आळा बसावा, यासाठी 600 रुपये ब्रास वाळू विक्रीचे नवे धोरण आणले. परंतू तरीही श्रीरामपूर तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. तस्करांवर कारवाईसाठी महसूल विभाग तसेच तालुका पोलिसांनी संयुक्तिक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील सरला गोवर्धन परिसरात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 7 वाहनांवर या पथकाने कारवाई केली. गोदावरी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अनेदा कारवाईसाठी पथक गेले, मात्र छाप्यापूर्वीच तस्कर पसार व्हायचे. महसूलमधून बातमी लिक होत असल्याने असे घडत असल्याचा संशय व्यक्त होत होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news