पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅटजीपीटीची निर्मित करणाऱ्या ओपन एआय या कंपनीने सीईओ सॅम अल्टमन यांना पदावरून हटवल्यानंतर अल्टमन यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. आजची सकाळी विचित्र आहे, तुम्ही जिवंत असताना तुम्हाला श्रद्धांजली वाहिली जावी, असा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले आहेत.
सॅम अल्टमन स्वतः ओपन एआयचे सहसंस्थापकांपैकी एक आहेत. चॅटजीपीटीची निर्मिती केल्यानंतर जनरेटिव्ह एआयचे नवे जग खुले झाले. पण त्यांना तडकाफडकी हटवल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
अल्टमन म्हणतात, "मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, ते म्हणजे तुमच्या मित्रांना भेटा आणि ते किती मोठे काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक करा. तुम्ही माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, त्याबद्दल मी स्तिमित झाले आहे. "
ओपन एआयने सॅम अल्टमन यांच्या जागी मीरा मुराती यांची नियुक्ती सीईओ म्हणून केली आहे. संचालक मंडळाने म्हटले आहे, "सॅम अल्टमन यांचा संचालक मंडळाशी संवाद सुस्पष्ट नव्हता. ओपन एआयचे नेतृत्व करण्यात ते सक्षम आहेत, असे आम्हाला वाटत नाही. एकूण मानव जातीच्या हितासाठी एआयचा वापर झाला पाहिजे, असे आमचे ध्येय आहे आणि ओपन एआयची रचना जाणीवपूर्वक त्या पद्धतीने झाली आहे. याच ध्येयासाठी कार्यरत राहण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. सॅम अल्टमन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत. पण पुढे जात असताना नवीन नेतृत्त्वाची गरज आहे."
हेही वाचा