AI संपूर्ण मानव जातच नष्ट करू शकते, चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टमन यांची खळबळजनक कबुली | पुढारी

AI संपूर्ण मानव जातच नष्ट करू शकते, चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टमन यांची खळबळजनक कबुली

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा (AI) अवघ्या जगाला धोका आहे. तंत्रज्ञान कंपन्या ‘एआय’ला अतिरेकी महत्त्व देत आहेत, यातून जगाच्या, मानवाच्या अस्तित्वालाही धोका उद्भवणे शक्य आहे, असे चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टमन यांनी अमेरिकन संसदीय समितीसमोर स्पष्ट केले. प्रोग्रामर चुकून एखादा सुपर इंटेलिजन्स तयार करणे शक्य आहे आणि हे सुपर इंटेलिजन्स माणसाचे अस्तित्वच जगातून संपवून टाकणेही शक्य आहे, अशी खळबळजनक कबुलीही सॅम यांनी दिली.

सॅम यांनी हे धोके वर्तविले

लोकशाहीला धोका : निवडणुकीत ‘एआय’च्या मदतीने, मतदारांपर्यंत अपेक्षित माहिती, अपेक्षित प्रमाणात पाठवणे शक्य आहे.

नोकर्‍यांवर परिणाम : लाखो नोकर्‍या जातील. काही क्षेत्रांत टाळेबंदीही शक्य आहे. ते कसे कमी करता येईल, हे सरकारने ठरवायचे आहे.

संगीत, कला : संगीतासह सर्वच कलांवर ‘एआय’चा विपरीत परिणाम होणार आहे. ‘एआय’च्या माध्यमातून बनवली जाणारी चित्रेही एक धोकाच आहेत.

चुकीची माहिती : ‘एआय’ प्रणाली मोठ्या विश्वासाने एखादी माहिती देत असली, तरी कल्पित गोष्टींपासून तथ्य वेगळे करणे, हे आव्हानच आहे.

‘एआय’चे हे लाभ शक्य : हवामान बदल. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार शोधण्यात ‘एआय’ भूमिका बजावेल.

Back to top button