पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या OPEN AI या कंपनीचे सीईओ सॅम आल्टमन यांना टाइम मासिकाचा सर्वोत्तम सीईओचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सॅम आल्टमन यांच्या नेतृत्त्वाखाली OPEN AIने चॅटजीपीटीची निर्मिती केली. माणसांसारखाच संवाद चॅटजीपीटीसोबत साधता येतो. चॅटजीपीटीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. चॅटजीपीटीनंतर देशात जगातील अनेक कंपन्यांनी जनरेटिव्ह एआयच्या निर्मितीत पाऊल टाकले.
सॅम आल्टमन स्टॅनफर्ड विद्यापीठातील ड्रॉपआऊट विद्यार्थी आहेत. त्यांनी सोशल नेटवर्किंग अॅप Loopt बनवले होते, ते ४३ दशलक्ष डॉलरना विकले गेले, त्यानंतर त्यांनी Y Combinator या कंपनीचे नेतृत्व केले. २०१५ला त्यांनी OPEN AIची स्थापना केली. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सची निर्मिती करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते काम करत आहेत.
नफा मिळवणे हा OPEN AIचा हेतू नव्हता. २०१९ला कंपनीचे स्वरूप बदलण्यात आले. नंतरच्या काळात मायक्रोसॉफ्टने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. त्यानंतर चॅटजीपीटी४ची स्थापना करण्यात आली. त्यातून OPEN AI ही जनरेटिव्ह AIमधील मोठी कंपनी बनली.
नोव्हेंबर महिन्यात संचालक मंडळाने आल्टमन यांची हकालपट्टी केली. पण यातून कर्मचारी आणि गुंतवणुकदार कंपन्यातून फारच नकारात्मक प्रतिक्रिया उमटली, त्यानंतर आल्टमन यांना पुन्हा सीईओ पदावर नेमण्यात आले.
हेही वाचा