Gold jewellery | सोने दागिन्यांवर हॉलमार्क सहा अंकी कोड अनिवार्य, अन्यथा १ एप्रिलपासून विक्रीवर बंदी

Gold jewellery | सोने दागिन्यांवर हॉलमार्क सहा अंकी कोड अनिवार्य, अन्यथा १ एप्रिलपासून विक्रीवर बंदी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : जर तुम्ही येत्या ३० मार्चनंतर सोन्याचे दागिने (Gold jewellery) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात बदल केला आहे. ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) विना सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृती विकल्या जाणार नाहीत. याचाच अर्थ हॉलमार्क सहा अंकी कोडविना सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या कार्यवाहीचा एका बैठकीत आढावा घेतला. मायक्रो स्केल युनिट्समध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी BIS विविध उत्पादन प्रमाणीकरण योजनांमध्ये (certification schemes) प्रमाणीकरण तसेच किमान मार्किंग शुल्कावर (certification/minimum marking fee) ८० टक्के सवलत देईल, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. हे १६ जून २०२१ पर्यंत ऐच्छिक होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात २५६ जिल्ह्यांमध्ये हे अनिवार्य करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३२ जिल्ह्यांत हे अनिवार्य करण्यात आले. आता एकूण २८८ जिल्ह्यांत हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. यात आणखी आत ५१ जिल्हे जोडले जात आहेत.

"१ एप्रिल २०२३ पासून हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीला परवानगी असेल," असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी सांगितले की, "ग्राहकांच्या हितासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की ३१ मार्चनंतर, HUID विना हॉलमार्क केलेल्या सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीस परवानगी दिली जाणार नाही." सध्या चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) सध्या वापरले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

असे असेल हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन

हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्यामध्ये संख्या आणि अक्षरे असतात. हॉलमार्किंगच्या वेळी दागिन्यांच्या (Gold jewellery) प्रत्येक वस्तूंला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन दिले जाणार आहे. अ‍ॅसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर (AHC) येथे दागिन्यांवर युनिक नंबरचा शिक्का मारला जातो. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या बैठकीत पियूष गोयल यांनी BIS ला हॉलमार्क तपासणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news