जळगाव : पुढारी वृत्तसेवा
बोलीभाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लुप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास, सर्वप्रथम बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खानदेशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला.
कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये झालेल्या खानदेशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) – कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी) – जामनेर, डॉ. पुष्पा गावित (भिल्ली) – धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद आणि डॉ. सविता पटेल (गुर्जर) – नंदुरबार यांनी सहभाग घेतला होता. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
डॉ. सविता पटेल यांनी, प्रत्येकाला आपल्या बोलीभाषेचा अभिमान असला पाहिजे, असे मत नोंदवत गुर्जर भाषेचा इतिहास व सद्यस्थितीची आढावा घेतला. डॉ. मेढे यांनी, संपूर्ण भारतात जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील २२० गावांमध्ये लेवा समाजाची वस्ती असल्याचे मत नोंदवले. ही भाषा उच्चारदृष्ट्या साधी आणि सोपी बोली असल्याचे सांगितले. डॉ. गावित यांनी, भिल्ली बोलीभाषा अतिप्राचीन असून, महाभारतातही भिल्ल जमातीचा उल्लेख असल्याचे सांगितले. कौतिक कोळी यांनी तावडी भाषेचा आढावा घेत भाषेचे संवर्धन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीभाषेवर बोलताना ही खानदेशची मुख्य बोली असून, या भाषेला गोडवा तसेच मोठा इतिहास असल्याचे सांगितले.
आजचे कार्यक्रम असे …..
दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी स.९ वा. श्री. बाबा साहेब सौदागर यांची मुलाखत. नंतर स.१०.३० वा अभिरूप न्यायालय यांत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत या विषयावर चर्चा होईल. दु.१२ वा. परिसंवादः मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल आयोजित केला आहे. दु.३ वा. लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या मंडपात स.९.३० वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य. स. ११ वा. साहित्यिकांचे शताब्दी स्मरण मध्ये शाहीर साबळे, जी.ए. कुलकर्णी, के.ज. पुरोहित-शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक, इ. साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दु. २ वा. भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. तसेच दोन दिवस कवी कट्टा, एक दिवस गझल कट्टा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच आज रविवार, दि. ०४.०२.२०२४ रोजी, सायं. ७.०० ते ९.०० वाजता सभामंडप खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. यामध्ये "जाऊ देवाचिया गावा" (संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य) सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी नीरजभाऊ अग्रवाल : ९४२२२७८३८१ यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.