सुमारे पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली होती. जगभरातील नामवंत व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली होती. यानंतर पुन्हा एकदा ('Pandora Papers') 'पँडोरा पेपर्स' मधून अशीच माहिती उजेडात आली आहे. विदेशात गुप्त गुंतवणूक केलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योजक अनिल अंबानी यांच्यासह ३०० भारतीयांची नावे 'पँडोरा पेपर्स'मधून समोर आली आहेत.
कर सवलत मिळविण्यासाठी विदेशात गुंतवणूक केलेल्यांमध्ये नीरा राडिया, हजारो कोटींचा घोटाळ्यातील आरोपी नीरव त्याची बहिण पूर्वी मोदी यांच्यासह भारतातील ३०० जणांचा समावेश आहे. यामधील ६० नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. या यादीतील सर्वांच्या नावाचा खुलासा टप्प्याटप्प्याने केला जाईल, असेही ('Pandora Papers') 'पँडोरा पेपर्स'ने स्पष्ट केले आहे.
द इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टस ( आयसीआयजे)व्दारे जगभरातील ११७ देशांमधील १५० हून अधिक माध्यम समुहाच्या ६५० हून अधिक पत्रकारांनी केलेल्या पाहणीत ही माहिती उजेडात आली.
जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संबंधित तब्बल १ कोटी २० लाख गोपनीय आर्थिक गुंतवणूक कागदपत्रांची पाहणी केली. यामध्ये ६४ लाख कागदपत्रे, सुमारे ३० लाख छायाचित्रे, १० लाखांहून अधिक ई मेल आणि ५ लाखांहून अधिक स्प्रेडशीटचा समावेश आहे.
ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, पनामा, बेलिझ, सायप्रस, युएई, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड येथील आर्थिक कंपन्याच्याही गोपनीय कागदपत्रांची माहिती घेण्यात आली. जगभरातील विविध ठिकाणी होणारे गोपनीय आर्थिक व्यवहार, कर चुकविण्यासाठी करण्यात आलेली गुंतवणूक याचा खुलासा करण्यात आला आहे. ('Pandora Papers') 'पँडोरा पेपर्स' हा आजवरच जभरातील सर्वात मोठा गुप्त आर्थिक गुंतवणुकीचा खुलासा मानला जात आहे.
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची ब्रिटिश व्हर्जिन आयलँडसमधील एका कंपनीत लाथार्थ मालक म्हणून सचिन तेंडुलकरसह त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. जुलै २०१६ मध्ये ही कंपनी अवसायनात गेली होती. यावेळी सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि आनंद मेहता यांचे अनुक्रमे ९, १४ आणि ५ समभाग होते. सचिनच्या नावे असणार्या समभागांची किंमत ८५६, ७०२ पौंड तर अंजली तेंडुलकर आणि आनंद मेहता यांच्या नावे असणार्या समभागांची किंमत ही अनुक्रमे १, ३७५,७१४ आणि ४५३,०८२ पौंड होती. अंजली तेंडुलकर यांना ६० समभागाचे पहिले प्रमाणपत्र मिळाले होते. तर दुसरे प्रमाणपत्र ३० समभागांचे होते. मात्र बायबॅक केलेल्या समभागाची माहिती उपलब्ध आहे. एकुण ६० समभागाचे भारतीय चलनात सुमारे ६० कोटी रुपये त्याचे मूल्य हाेते. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर तीन महिन्यांनी सचिन तेंडुलकर याने ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील आपली संपतीची विकण्याचा प्रयत्न केला होता, असेही या ( 'Pandora Papers' )'पँडोरा पेपर्स'मध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर यांची सर्व मालमत्ता आणि कर याची माहिती जाहीर केलेली आहे. असा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, असा दावा सचिन तेंडुलकर यांच्या प्रवक्त्याने केला आहे.
( 'Pandora Papers') 'पँडोरा पेपर्स'मध्ये भारतातील उद्योजक अनिल अंबानी यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांनी स्वत:ला ब्रिटनच्या न्यायालयात दिवाळखोर असल्याचे सांगितले होते. अनिल अंबानी यांची विदेशातील १८ कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. या यादीत भारतातील ३०० जणांचा समावेश आहे. यामधील ६० नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांच्या नावाचा खुलासा टप्प्याटप्प्याने केला जाईल, असेही म्हटले आहे.
('Pandora Papers') 'पँडोरा पेपर्स'मध्ये जगभरातील ९० देशांमधील ३३० राजकीय नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी आपले आर्थिक व्यवहार गुप्त कंपन्यांशी केले आहे.
जॉर्डनचे राजा, युक्रेन, केनिया, इक्वाडोरचे राष्ट्रपती, चेक रिपब्लिकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, पाकिस्तानमधील ७०० नागरिकांच्या नावाचा समावेश आहे.
तसेच रशिया, अमेरिका, मॅक्सिकोमधील सुमारे १३० अब्जाधीशांचाही समावेश आहे.