Ukraine-Russia crisis : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा

Ukraine-Russia crisis : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Ukraine-Russia crisis : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शरण येण्याचे आवाहन केले आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी पहाटे टीव्हीवरुन संबोधित करताना म्हटले आहे की रशिया पूर्व युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन करेल. याबाबतचे वृत्त एपी आणि बीबीसीने दिले आहे.

युक्रेन (Ukraine-Russia crisis) सीमेवर चकमकी सुरू आहेतच, त्यासह युक्रेनच्या रशियन लष्कराने ताब्यात घेतलेल्या डोनेट्स्क भागातही चकमकींचे प्रमाण वाढलेले आहे. लुहान्स्कमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. आता बंडखोरांच्या (रशिया समर्थक) ताब्यात नसलेल्या भागांवरही रशियन फौजा चढाई करणार आहेत. रशियन लष्कराने तसे अधिकृतपणे जाहीर केल्याने या एकूणच भागांतील हजारो युक्रेनियन रहिवासी आपापले किडूकमिडूक आवरून देशाच्या पश्‍चिम भागाकडे निघाले आहेत.

समाजमाध्यमांतून युक्रेनमध्ये शिरत असलेल्या रणगाड्यांच्या व्हायरल होत असलेल्या द‍ृश्यांनी युक्रेनियन रहिवाशांना धडकी भरवलेली आहे. पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत डोनेट्स्क, लुहान्स्कचा एक तृतीयांश भाग रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात आहे. उर्वरित भाग युक्रेनच्याच नियंत्रणाखाली आहे. आता रशियाच्या फौजा या भागांतही घुसणार म्हटल्यावर मोठा संघर्ष होईल, असे मानले जात आहे. सामरिक बळाची तुलना केली असता, रशिया युक्रेनपेक्षा किती तरी पटीने वरचढ आहे.

युक्रेनमधील पूर्वेकडील बंडखोरांच्या प्रत्यक्ष ताब्यात नसलेल्या भागांवरही रशियन फौजा आपला कब्जा जमविण्यात यशस्वी होतील, असेही मानले जाते. अर्थात, युक्रेनकडूनही मजबूत तटबंदी करण्यात आली आहे. 451 किलोमीटर लांबीच्या संपर्क रेषेवर भूसुरुंग पेरण्यात आले आहेत. मोर्चेबंदीही केली आहे.

तथापि, ती सर्व मोडीत काढून रशिया हवाईदल तसेच नौसेनेचा वापर करून या भागांवर कब्जा जमवू शकते, असेही सामरिक तज्ज्ञांना वाटते. अर्थात, रशियाने तसे उघडउघड जाहीरच केले आहे. थोडक्यात, पूर्व युक्रेन दीर्घकाळ युद्धाच्या खाईत लोटला जाईल. युद्ध कधी संपुष्टात येईल, हे आता सांगता येणार नाही.

युक्रेनमध्ये आणीबाणी

युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ही परिस्थिती 30 दिवसांपर्यंत लागू राहील. गरज भासल्यास आणखी 30 दिवसांची वाढ केली जाईल.

पुतीनना निर्णयाचे सर्वाधिकार

रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine conflict) पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कुठलाही अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना असल्याचे आवर्जून स्पष्ट करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news