कीव्ह : पुढारी ऑनलाईन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियन फौजांनी ४१० नागरिकांचे हत्याकांड केल्याचा आरोप केला आहे. बुचा हा शहरात ३०० नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या असून, महिलांवर बलात्कार आणि लहान मुलांच्या शरीरांचे तुकडे करणे असे प्रकार घडत असल्याचे आरोपही युक्रेनच्या अधिकार्यांनी केला असल्याचे वृत्त द सन या ब्रिटिश वेबसाईटने दिले आहे.
'द सन'ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, कीव्ह शहराच्या जवळपासच्या परिसरात रशियाच्या लष्कराने ४१० नागरिकांची हत्या केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. बुचाचे महापौर अॅनातोली फेडेरूक यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत एक नागरिकाचे हात बांधून त्याच्या डोक्यात रशियन सैनिक गोळी झाडत असल्याचे दिसत आहे.तर जवळच्याच इरपिन या नगरातून रशियन फौजांनी महिला आणि मुलींची हत्या केल्याचे वृत्त आहे. या महिलांचे मृतदेह नंतर रणगाड्यातून नेण्यात आले.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री डिमीट्रो कुलेबा यांनी रशियाच्या फौजांची तुलना सिरियातील इस्लामिक स्टेटशी केली आहे. "आम्ही मृतदेह ताब्यात घेत आहोत. पण मृतांची संख्या आताच शेकड्यात गेलेली आहे," असे ते म्हणाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रशिया वंशसंहार करत असल्याचे म्हटले आहे. "रशिया एक राष्ट्र आणि त्याचे सर्व नागरिक यांना नष्ट करत आहे," अशी टीका त्यांनी केली आहे. युक्रेनमध्ये नागरिकांची हत्या केल्याचा आरोप रशियाने फेटाळला आहे.
हेही वाचा: