नागपूर विमानतळावर रनवेचे दिवे बंद, अनेक विमाने खोळंबली, प्रवासी संतप्त !

file photo
file photo

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवरील सिग्नलिंगच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले दिवे बंद झाले, केबल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे (शुक्रवार) रात्री अनेक विमानांचा खोळंबा झाला. सुमारे 20 ते 25 विमाने इतरत्र वळवावी लागली किंवा उशिराने नागपुरात दाखल झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

सुमारे दोन तास हा बिघाड दुरुस्त करण्यात गेले. यानंतर विमानसेवा पूर्वत सुरू झाली. दरम्यान, या काळात नागपुरात विमानतळावर बराच काळ ताटकळत बसलेल्या हवाई प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तातडीने जाणाऱ्या अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला. नागपूर विभागात गेल्या तीन-चार दिवसात सातत्याने सुरू असलेल्या वादळी पावसाचा फटका या यंत्रणेला बसल्याचे बोलले जाते. खोळंबलेल्या विमान सेवांमध्ये इंडिगो एअरलाईनचे दिल्ली-नागपूर विमान, इंदोर -नागपूर, नाशिक-नागपूर, दिल्ली, हैदराबाद गोवा, मुंबई, लखनऊ अशी सर्व विमाने जवळपास दोन ते अडीच तास विलंबाने रवाना झाली. या सोबत दिल्ली व मुंबई येथून नागपुरातून येणारी नियमित विमाने उशिराने आली.

या घटनेने विमानतळ प्रशासनात तारांबळ उडाली. केबल दुरुस्तीचे काम करण्यात दोन अडीच तासांचा कालावधी लागला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, एटीसीकडून सिग्नल मिळाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत झाली. दरम्यान, नागपूर विमानतळावर संतप्त प्रवाशांनी एक्सवर हा प्रकार टाकला. सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. उशीर झाला तर आपल्याला जेवणही दिले नाही अशी पोस्ट एका प्रवाशाने केल्याने या गोंधळात अधिक भर पडली. विमानाचे उड्डाण विलंबाने होत असल्यास प्रवाशाला मेसेज अपेक्षित असताना एअरलाइन्स कंपन्यांकडून चेक इन झाल्यानंतर या विलंबाबाबत माहिती देण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मुळात नेमका कशामुळे विलंब होतो हे देखील सांगितले न गेल्याने संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news