Vidarbha Rainfall: गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम, भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभुती | पुढारी

Vidarbha Rainfall: गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम, भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभुती

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला होता. तो खरा ठरवत मंगळवार ९ एप्रिलपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप कयम आहे. ९ व १० एप्रिल दोन दिवस रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास वादळी पावसाने मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली असता गुरुवारी सकाळपासून दिवसभर पावसाची रिपरिप असताना काल, शुक्रवारी व आज शनिवारी पुन्हा पहाटेपासून शीतलहरीसह तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. एकंदरीत अवकाळी पावसाने जिल्ह्यात जणू मुक्कामच ठोकला असून भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव गोंदियाकरांना येत आहे.  (Vidarbha Rainfall)

हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. मंगळवार व बुधवार दोन दिवस कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात झाली. तर रात्रीच्या साडेअकराच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने झोडपून काढले. त्यातच गुरुवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. (Vidarbha Rainfall)
दरम्यान, गुरुवारी (दि.११) दिवसभर ठराविक अंतराने पावसाच्या सरी बरसल्या. तर सायंकाळच्या सुमारास उघडीप दिल्यानंतर रात्रभर ढगाळ वातावरण होते. त्यातच काल शुक्रवारी पुन्हा पहाटेपासून सकाळी १० वाजतापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. तर आज पुन्हा पहाटेपासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप कायम आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने मुक्काम ठोकल्याचे चित्र असून वादळी पावसामुळे विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात विज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यात हवामान खात्याकडून १४ एप्रिलपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची रिपरिप राहणार आहे. (Vidarbha Rainfall)

▪️शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ…

या पावसामुळे कापणीला आलेला गहू, मका रब्बी पिकांसह, फुलोर्‍यावरील उन्हाळी धान, भाजीपाला, आंबा पिकाला फटका बसला आहे. तर मोहफुल संकलनही अडचणीत आला असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

▪️जिल्ह्यात सर्वत्र थंडीची लहर..

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून भर उन्हाळ्यात नागरिकांना थंडीचा अनुभव होत आहे.

Back to top button