RSS chief mohan bhagwat : ‘कलम ३७० हटवूनही जम्मू-काश्मिरचे लोक समाधानी नाहीत’

मोहन भागवत
मोहन भागवत
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. ३७० नावावर जो भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जात होता आता राहिला नाही. तसेच जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे सर्व काही ठीक झाले असे मानणेही योग्य होणार नाहीत. राज्यातील लोकांना उर्वरित भारताशी जोडणे आवश्यक असल्याचे प्रतिवादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS chief mohan bhagwat) यांनी केले.

नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे 'सेंटर फॉर लद्दाख, जम्मू-कश्मीर स्टडिज' (सीएलजेकेएस) द्वारे निर्मीत " जम्मू कश्मीर: ऐसिहासिक परिपेक्ष्य में धारा ३७० के संशोधन के उपरान्त " आणि "आधुनिक लद्दाख के निर्माता उन्नीस वे कुशोग बकुला" या दोन पुस्तिकांचे डॉ. भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की, जम्मू-काश्मिरला वेगळे स्टेटस देणारे कलम ३७० अन्यायपूर्ण होते यात संशय नाही. भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी हे कलम हटवून हा अन्याय काही प्रमाणात दूर केलाय. परंतू, ३७० हटवणे ही केवळ परिवर्तनाची नांदी म्हणता येईल. याला परिवर्तन म्हणता येणार नसल्याचे भागवत यांनी सांगितले.

आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे

काश्मिरी जनतेच्या मनात उर्वरित भारताबाबत आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर समाजाला पुढे येऊन त्यांच्या मनात जिव्हाळ्याचा नंदादीप प्रज्ज्वलीत करावा लागेल. असे झाले तरच काश्मिरींच्या मनात हा देश आणि राष्ट्रीयत्व रूजण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जम्मू-काश्मिरच्या संदर्भात सुस्पष्टपणे विचार मांडताना सरसंघचालक म्हणाले की, कुठलाही देश कायदा किंवा धाक दाखवून एकसंघ होऊ शकत नाही. त्यासाठी त्या देशातील नागरिकांच्या मानात परस्परांविषयी आपुलकी, जिव्हाळा असणे क्रमप्राप्त ठरते.

सरकार व्यवस्था निर्माण करू शकते. परंतु, लोकांच्या मनात बळजबरीने राष्ट्रीयत्व आणि आपुलकी निर्माण होणार नाही. काश्मिरी जनतेच्या मनात उर्वरित भारताबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी समाजाला पुढाकार घ्यावा लागेल. ज्या प्रमाणे शरीराचा एक अवयव दुसऱ्याबद्दल जिव्हाळा ठेवतो तसा भाव आम्हाला काश्मिरी लोकांच्या मनात उत्पन्न करावा लागेल असे आवाहन त्यांनी केले

जम्मू-कश्मिरात तीन मतप्रवाह

यावेळी सरसंघचालकांनी सांगितले की, ३७० हटवल्यानंतर सर्वकाही आपोआप ठीक होईल असे मानणे म्हणजे वैचारिक सुस्तता ठरेल. कुठलाही गोष्टी आपोआप होत नसते त्यासाठी सामूहिक आणि सच्च्या प्रयत्नांची गरज पडते. जम्मू-काश्मिरात आजघडीला तीन प्रकारचे मतप्रवाह आहेत. त्यापैकी पहिला प्रवाह पाकिस्तानशी हातमिळवणी करून जगणाऱ्यांचा आहे. तर दुसऱ्या प्रवाहात वरपंगी बदलांचा आनंद घेऊन मनातून स्वातंत्र्याची कामना करणारे लोक आहेत. तिसऱ्या प्रवाहात खरोखर भारत आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवणारे लोक आहेत.

यामध्ये तिसऱ्या प्रकारच्या लोकांचे प्रमाण मोठे असले तरी ते विखुरलेले आहेत. त्यांना जोडण्यासाठी सामाजिक पुढाकाराची गरज असल्याचे भागवत यांनी सांगितले. नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमाची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, मुंबईच्या कार्यक्रमात काही काश्मिरी तरुणांची भेट झाली. हे तरुण भारत आणि भारतीय संविधानावर विश्वास ठेवतातत. या तरुणांना संपूर्ण काश्मिरचे प्रतिनिधी म्हणता येणार नाही. परंतु, या तरुणांप्रमाणे विचार करणारे असंख्य लोक आहेत. त्यांना प्रेम, आपुलकीने जोडणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले.

कुशोग बकुला सच्चे राष्ट्रभक्त

यावेळी कुशोग बकुला यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना डॉ. भागवतांनी सांगितले की, देश स्वतंत्र झाल्यावर १९४८ साली जेव्हा पाकिस्तानी सैनिक कबायली टोळ्यांमध्ये शामिल होऊन भारतात शिरले तेव्हा एकोणीसावे कुशोग बकुला यांनी लद्दाखच्या तरुणांना एकत्र करून कबायली टोळ्यांना पिटाळण्याचे काम केले.

शांतीप्रिय बौद्ध मतावलंबी असलेल्या कुशो बकुला यांनी त्यावेळी देशभक्ता म्हणून कर्तव्याचे पालन केले. त्यानंतर मंगोलियामध्ये राजदूत म्हणून काम करताना कुशोग बकुला यांनी स्थानिक बौद्ध बांधवांना तेथील सरकारच्या विरोधात संघर्ष न करता शांतीच्या मार्गाने आंदोलनाचा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्याला यशही मिळाले. कुशोग बकुला यांच्या संघर्ष आणि शांती या दोन्ही भूमिका अनुकरणीय असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news