कोल्हापूर ;पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी यापुढेही 'ई-पास' कायम ठेवण्याचा देवस्थान समितीचा विचार आहे. याबाबतचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवानंतरही बुधवार, दि. 20 पर्यंत 'ई-पास'द्वारेच दर्शन घेता येणार आहे.
नवरात्रौत्सवात भाविकांसाठी 'ई-पास' बंधनकारक करण्यात आला होता. नवरात्रीनंतर अंबाबाई दर्शनाबाबत देवस्थान समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष होते. मात्र कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी असते. यामुळे नवरात्रीनंतरही पुढे काही दिवस ई-पासद्वारेच दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दि. 20 पर्यंतचा स्लॉट बुकिंगसाठी खुला करण्यात आला आहे.
नवरात्रौत्सवानंतर शिवाजी चौक ते भवानी मंडप हा भाऊसिंगजी रोड खुला करण्यात आला आहे. आजपासून ई-पासद्वारे दर्शन घेणार्या भाविकांना भवानी मंडपातून सोडण्यात येत होते. याच पद्धतीने यापुढेही भवानी मंडपातूनच ई-पासद्वारे भाविकांना सोडता येईल का, याबाबत पाहणी करण्यात आली.
श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्य व देशभरातूनही भाविक येतात. भाविकांना वेळेत दर्शन व्हावे याकरिता अन्य देवस्थानप्रमाणे दर्शनासाठी शुल्क (पेड दर्शन) आकारता येईल का, याबाबतही चर्चा सुरू आहे. सध्या महाद्वारातूनच मुखदर्शन दिले जाते. त्याऐवजी मंदिरातून मुखदर्शन कसे देता येईल, त्याची रांग कशी ठेवता येईल, या रांगेत कोरोनाचे सर्व नियमांचे पालन कसे करता येईल, यादृष्टीनेही आज देवस्थान प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
दर्शनासाठी यापुढे सर्वच भाविकांना ई-पास बंधनकारक करायचा का, स्थानिक भाविकांना दर्शनाचा लाभ कसा घेता येईल, सशुल्क पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र रांग आणि वेळा निश्चित करायच्या का आदी विविध पर्यायांवर सध्या चर्चा सुरू आहे. सर्वच बाबींचा सखोल विचार करून त्यातून सर्वसमावेशक नियमावली तयार केली जाणार आहे. त्यानंतरच दर्शनाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, दरम्यान, दि. 20 पर्यंत तरी ई-पासद्वारेच दर्शन घ्यावे लागणार असल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.