Ronaldo 200 th Match : रोनाल्‍डोने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

Ronaldo 200 th Match : रोनाल्‍डोने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  जगातील सर्वाधिक लोकप्रिय  फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर २०० सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मंगळवारी ( दि. १९) आईसलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी या कामगिरीबद्दल त्याचा गौरवही करण्यात आला होता. रोनाल्डोचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
(Ronaldo 200th Match )

आंतरराष्ट्रीय सामन्‍यांमध्‍ये आतापर्यंत एकूण १२३ गोल

आइसलँडविरुद्धच्या युरो २०२४ पात्रता सामना संपण्यास एक मिनिटांचा कालावधी असताना रोनाल्डोनेसंघाला १-० असा विजय मिळवून दिला. रोनाल्डोने या स्‍पर्धेत पोर्तुगालला चौथा विजय मिळवून दिला. संघाने चार सामन्यांत चार सामने जिंकले आहेत. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय सामन्‍यांमध्‍ये आतापर्यंत एकूण १२३ गोल केले आहेत. रोनाल्डोसह त्याच्या संघाने सामन्यात अनेक संधी गमावल्या, पण शेवटी पोर्तुगालच्या संघाला यश मिळाले. रोनाल्डोने या सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध केले की तो युरो २०२४ साठी सज्ज असल्‍याचे दाखवून दिले.

पोर्तुगालसाठी खेळणे हे माझ्यासाठी नेहमीच स्वप्न : रोनाल्‍डो

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर २०० सामने खेळणे हे खूप काही आहे. ज्या दिवसापासून मी फुटबॉलमध्‍ये पदार्पण केले त्या दिवसापासून पोर्तुगालसाठी खेळणे हे माझ्यासाठी नेहमीच एक स्वप्न होते. २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणे हे माझे देशावर आणि राष्ट्रीय संघावर असलेले प्रेम व्‍यक्‍त करणारे आहे. मला आणि प्रशिक्षक यांना असे वाटते तोपर्यंत मी फुटबॉल खेळेन. पोर्तुगीज लोकांना आनंद देत मला खेळत राहायचे आहे. हा एक लांबचा प्रवास आहे आणि तो लवकरच संपणार नाही, मला आशा आहे, असे रोनाल्‍डो याने माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

Ronaldo 200th Match : रोनाल्डो

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी हे समकालीन सर्वश्रेष्‍ठ फुटबाॅलपटू म्‍हणून ओळखले जातात. नेहमीच दाेघांच्‍या खेळाची तुलना केली जाते. मेस्‍सीने मागील वर्षी अर्जेटिना संघाचे नेतृत्त्‍व करत देशाला फुटबाॅल विश्‍वचषक मिळवून दिला. त्‍यामुळे मेस्‍सीची कामगिरी ही राेनाल्‍डाेपेक्षा सरस मानली गेली. आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील फुटबाॅल सामन्‍यांचा विचार करता सर्वाधिक म्‍हणजे २००  सामने खेळण्‍याचा विक्रम राेनाल्‍डाेच्‍या नावावर आहे. कुवेतचा बद्र अल मुतावा रोनाल्डोनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९६ सामने खेळले आहेत. मेस्सी या यादीत १७५ सामन्यांसह अकराव्या स्थानावर आहे. भारताच्या सुनील छेत्रीने १३७ सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत रोनाल्डोनंतर इराणचा माजी फुटबॉलपटू अली देईचे नाव येते. त्याने १४८ सामन्यांमध्‍ये १०९ गोल केले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news