पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, भारताच्या पराभवावर सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिक्रिया देताना म्हटले की, पहिल्या डावात १०९ धावांवर सर्व गडी बाद होणे, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पहिल्या डावात धावा न केल्यामुळे भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाचे हे प्रमुख कारण ठरले. (IND vs AUS 3rd Test)
जेव्हा तुम्ही कसोटी सामना गमावता, तेव्हा अनेक गोष्टी त्यास कारणीभूत असतात. पहिल्या डावात आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही. मोठी धावासंख्या करता आली नाही. फलंदाजांनी मोठी खेळी करण्याची आवश्यकता होती. परंतु ती आम्ही करू शकलो नाही. पहिल्या डावात आम्ही चांगली फलंदाजी केली असती तर परिस्थिती वेगळी असती. या पराभवावर आम्ही विचार करू, असेही शर्मा (Rohit Sharma) म्हणाला.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, खेळपट्टी कोणतीही असो, आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे, हे समजून घ्यायला हवे होते. जेव्हा तुम्ही आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळत असता तेव्हा तुम्हाला धैर्य दाखवावे लागते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी योग्य लेंथवर गोलंदाजी केल्यामुळे आम्हाला फलंदाजी करताना त्रास झाला.
भारताच्या दुसऱ्या डावात लिओनने ८ विकेट घेतल्या होत्या. याबद्दल रोहितने लियॉनचे कौतुक करताना म्हटले की, त्याने फक्त एकाच ठिकाणी गोलंदाजी केली. ज्यामुळे तो यशस्वी झाला. आमच्या खेळाडूंनी अशा आव्हानाला सामोरे जावे, अशी माझी इच्छा आहे, आमचा नक्कीच खराब खेळ झाला. इंदूर कसोटी सामन्यात आम्ही आमच्या योजना आखण्यात अपयशी ठरलो. दरम्यान, या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक गडी गमावून पूर्ण केले. (IND vs AUS 3rd Test)
हेही वाचा