IND vs AUS 3rd Test Day 3 | तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

IND vs AUS 3rd Test Day 3 | तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

IND vs AUS 3rd Test Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील इंदूरमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. आता तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी राहिली आहे. दरम्यान, या विजयामुळे ऑस्ट्रेलिया लंडनमध्ये होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी भारताला मालिकेतील उर्वरित एक सामना जिंकणे अनिवार्य आहे.

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य होते. ते त्यांनी तिसऱ्या दिवशी सहज पार केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला होता. अश्निनने दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला शुन्यावर आउट केले. श्रीकर भरतने त्याचा झेल टिपला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (49 धावा) आणि मार्नस लॅबुशेन (28 धावा) जोडीने बिनबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.

खेळाच्या दुसर्‍या दिवशी भारतीय संघाने आपल्या दुसर्‍या डावातही ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पुन्हा एकदा शरणागती पत्करली. कांगारूंच्या पहिल्या डावातील 88 धावांची आघाडी मोडून काढता-काढता रोहित सेनेची अक्षरश: भंबेरी उडाली. नॅथन लायनचे 8 बळी, तर स्टार्क आणि कुहेमनच्या 1-1 विकेटच्या जोरावर स्मिथच्या संघाने टीम इंडियाचा 163 धावांत खुर्दा उडवला. भारताने कशीबशी 75 धावांची आघाडी मिळवली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारताकडून चेतेश्वर पुजाराने (59) एकमेव अर्धशतक झळकावले. गुरुवारी सकाळी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत गुंडाळला. यासह मोठी आघाडी घेण्यास कांगारूंना अपयश आले. 88 धावांची आघाडी घेऊन दुसर्‍या डावासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. उपाहारापर्यंत भारताने दुसर्‍या डावात एकही विकेट न गमावता 13 धावा केल्या. उपाहारानंतर पहिल्याच षटकात नॅथन लायनने शुभमन गिलला (5) क्लीन बोल्ड करून भारताला पहिला धक्का दिला. तर, कर्णधार रोहित शर्माने (12) आपली विकेट स्वस्तात दिली. तो लायनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. यानंतर विराट कोहलीही काही खास करू शकला नाही आणि मॅथ्यू कुहेनमनच्या चेंडूवर तोही पायचित झाला. रवींद्र जडेजा सात धावा करून लायनचा बळी ठरला. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमण हाच बचाव हा पवित्रा स्वीकारला आणि लायनवर हल्ला चढवला. त्यामुळे कर्णधार स्मिथने मिशेल स्टार्कला गोलंदाजीस आणले. त्याचा हा डाव यशस्वी ठरला, स्टार्कच्या चेंडूवर ख्वाजाकडे झेल देऊन त्याने आपली विकेट गमावली. श्रेयसने 27 चेंडूंत 26 धावा फटकावल्या.

लायनने के. एस. भरतला (3) क्लीन बोल्ड करून भारताला सहावा धक्का दिला. दरम्यान, पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे 16 वे अर्धशतक ठरले. अश्विनला बाद करून लायनने 23 व्यांदा डावात पाच बळी घेण्याची कियमा केली. यानंतर बळींचा षटकार लगावत पुजाराला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. पुजारा 142 चेंडूंत 59 धावांची लढाऊ खेळी करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. लायनने संघासाठी सुखद शेवट केला. त्याने उमेशला ग्रीनच्या हाती झेलबाद आणि सिराजचा त्रिफळा उडवून भारताचा डाव 163 धावांवर गारद केला.

लायनने टीम इंडियाला नाचवले

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने दुसर्‍या डावात 64 धावांत आठ गडी बाद केले. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2017 मध्ये लायनने बंगळूरमध्ये 50 धावांत आठ विकेटस् घेतल्या होत्या. तसेच तो आशियाई मैदानात सर्वाधिक बळी घेणारा बिगर आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत आशियाई मैदानावर एकूण 130 बळी घेत शेन वॉर्नचा विक्रम मोडला आहे.

अश्विनने कपिलदेव यांना मागे टाकले

अश्विनने आंतरराष्ट्रीय विकेटस्च्या बाबतीत माजी क्रिकेटर कपिलदेव यांना मागे टाकले आहे. इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 3 बळी घेत त्याने ही कामगिरी नोंदवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपासह अश्विनने आतापर्यंत 269 सामन्यांतील 347 डावांत 689* विकेटस् घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 वेळा सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेटस् घेतल्या आहेत. तर कपिल यांनी 356 सामन्यांच्या 448 डावांत 687 विकेटस् घेतल्या आहेत. त्यांनी केवळ 2 वेळा सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेटस् घेतल्या आहेत. अश्विनपेक्षा फक्त हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेने यांच्या खात्यात जास्त विकेट आहेत. हरभजनने 365 सामन्यांच्या 442 डावांमध्ये 707 बळी घेतले आहेत. (IND vs AUS 3rd Test Day 3)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news