पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma No.1 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये टीम इंडियाची स्फोटक कामगिरी कायम आहे. 8 पैकी 5 सामने जिंकून भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित सेना सध्या इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळत असून यात 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका खास यादीत जगातील सर्व सलामीवीरांना मागे टाकले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात 2019 मध्ये झाली. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा मोसम खेळला जात आहे. रोहित शर्माने या मोसमात एक खास विक्रम केला आहे. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ठरला आहे. रोहित शर्माने डब्ल्यूटीसीमध्ये सलामीवीर म्हणून 31 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 48.98 च्या सरासरीने 2449 धावा फटकाल्या आहेत. या यादीत त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. डेव्हिड वॉर्नरने डब्ल्यूटीसीमध्ये सलामीवीर म्हणून 2423 धावा केल्या आहेत. (Rohit Sharma No.1)
2449 धावा : रोहित शर्मा
2423 धावा : डेव्हिड वॉर्नर
2238 धावा : उस्मान ख्वाजा
2078 धावा : दिमुथ करुणारत्ने
1935 धावा : डीन एल्गर
रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या डावात विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाला चांगली सुरुवात हवी होती. अशा प्रसंगी रोहित शर्माने कॅप्टन इनिंग खेळली. 81 चेंडूंचा सामना करताना त्याने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा फटकावल्या आणि संघाला विजयापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.