पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Salary : बीसीसीआयने (BCCI) कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलसाठी भारतीय खेळाडूंचा कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष करण्याचा कल पाहता हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. सध्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. अगामी आयपीएलनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी चर्चा आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'आयपीएलनंतर नवीन वेतन रचना लागू केली जाऊ शकते. यामध्ये खेळाडूने वर्षभरात संघासोबत सर्व कसोटी मालिका खेळल्यास त्याला बोनसही मिळेल. वार्षिक पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त त्याला पैसेही दिले जातील. खेळाडूंनी रेड बॉल क्रिकेट खेळण्यात अधिक रस दाखवावा यासाठी बोर्ड प्रयत्नशील आहे. त्यामुळे खेळाडूंना कसोटी खेळताना अधिक फायदा होणार आहे.' (Team India Salary)
कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे खेळाडूंच्या वेतन वाढीची योजना आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंच्या मानधन वाढीबाबत मसुदा तयार केला असून पुढील बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाल्यास अगामी या आयपीएल हंगामानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. एका मोसमातील सर्व कसोटी मालिका खेळल्यास खेळाडूला मिळणाऱ्या अतिरिक्त बोनसवर बीसीसीआय काम करत आहे. सध्या बीसीसीआय प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये वेतन देते. टीम इंडियाच्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांच्या ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. (Team India Salary)
अलीकडेच, बीसीसीआयने केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंबाबत इशारा दिला होता. जे खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि राष्ट्रीय संघाचा भाग नाहीत त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे बोर्डाने म्हटले होते. असे असूनही, इशान किशन, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि दीपक चहर या खेळाडूंनी त्यांच्या राज्यासाठी रणजी सामने खेळले नाहीत. इशान, कृणाल आणि चहर यांनी फेब्रुवारीमध्येच आयपीएलची तयारी सुरू केली. इशान मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पंड्या लखनऊ सुपरजायंट्सकडून आणि चहर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो.