पुढारी ऑनलाईन डेस्क : निवृत्ती केव्हा घ्यावी, याबाबत प्रत्येक क्रिकेटपटूचा निर्णय हा व्यक्तिगत असतो. मात्र मोठ्या स्पर्धा झाल्यानंतर सर्वच पातळीवर संघ अपयशी ठरल्यास काही वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करतात. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू आर. अश्विन हे टी-२० फाॅर्मेटमधून निवृत्त होवू शकतात, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसर याने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताची सुरुवात दिमाखदार झाली. मात्र सेमीफायनलमध्ये इंगलंडकडून टीम इंडियाचा लाजीरवाना पराभव झाला. हा पराभव माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींचाही जिव्हारी लागला आहे. आता संघातील ३० पार केलेले आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास अपयशी ठरलेल्या खेळाडूंची हकालपट्टी करण्यात यावी, असा सूरही चाहत्यांमधून व्यक्त होत आहे. असाच काहीसा सूर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मोन्टी पानेसर याने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
मोन्टी म्हणाला की, "भारत आणि इंग्लंड संघात झालेली सेमीफायनल ही पूर्णपणे एकतर्फी होती. या सामन्यात बटलर आणि हेल्ससोमर भारतीय गोलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवानंतर रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर. अश्विन हे आघाडीचे क्रिकेटपटू आता टी-२० फॉर्मेटमधून निवृत्त होतील. संघ व्यवस्थापन या खेळाडूंची चर्चा करेल. या वेळी हे खेळाडू युवा खेळाडूंचा मार्ग मोकळा करतील. पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेला दोन वर्षांचा अवधी आहे."
भारतीय क्रिकेट संघ हा घरच्या मैदान गाजवणारा संघ आहे. टीम इंडियाने २०११ मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक पटकावला होता. २०२३ मधील ५० षटकांचा विश्वचषक भारतातच होणार आहे. आता कर्णधार रोहित शर्मा यांचे लक्ष या विश्वचषक स्पर्धेवर असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारताचा संघ विश्वचषक जिंकेल, असा विश्वासही मोन्टी पानेसर याने व्यक्त केला आहे.
हेही वाचा :