भारतीय होऊ शकतो ब्रिटनचा पंतप्रधान, बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनाक यांना संधी

भारतीय होऊ शकतो ब्रिटनचा पंतप्रधान, बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनाक यांना संधी

लंडन ः वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये महाराष्ट्रासारखेच बंड झाले आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला. या पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच भारतीय वंशाचे आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांच्या पथ्यावर पडल्यास इंग्लंडच्या पंतप्रधानपदी एक भारतीय विराजमान होऊ शकतो.

ब्रिटनमध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर पंतप्रधान जॉन्सन हे पायउतार झाले. जोपर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. सेक्स स्कँडल आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ख्रिस पंचर यांची कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या डेप्युटी व्हिपपदी केलेली नियुक्‍ती जॉन्सन यांना भोवली. शिवाय गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांत केलेली मद्यपार्टीही त्यांच्या अंगलट आली.

गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या एक दिवस अगोदर जॉन्सन यांच्या या मद्यपार्टीचे फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर जॉन्सन यांनी राणीची माफी मागितली होती. महिनाभरापूर्वी झालेल्या अविश्‍वासदर्शक ठरावानंतर त्यांची खुर्ची वाचली होती. पण, भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनाक आणि आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी बंडाची सुरुवात केली आणि 48 तासांत 50 हून अधिक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने जॉन्सन यांना पद सोडावे लागले. स्वत:च्याच पक्षाच्या खासदारांचा विश्‍वास गमावल्याने जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले आहे.

अक्षता सुनाक सक्रिय

आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनाक आणि लिस ट्रस यांची नावे आघाडीवर आहेत. कोरोना काळात दिलेल्या आर्थिक पॅकेजमुळे सुनक यांची ब्रिटनमध्ये लोकप्रियता वाढली आहे. पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याने ऋषी यांच्या पत्नी अक्षता सक्रिय झाल्या आहेत. नवे अर्थमंत्री नदीम जाहवी, परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी संरक्षणमंत्री पैनी मॉर्डेट आणि बेन वॉलेस या नेत्यांची नावे सध्या पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहेत. तथापि, त्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती ऋषी सुनाक यांची. सुनाक यांच्या घरी गर्दी वाढू लागली आहे. सुनाक यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी बुधवारी स्वतः पत्रकारांसाठी चहा आणला. अक्षता या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.

जॉन्सन सरकार भल्यासाठी काम करेल अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती. मात्र असे काहीच घडलेच नाही. त्यामुळे आम्हाला बंड करावे लागले.
– ऋषी सुनाक

स्वकीयांचेच बंड

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी बंड करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. नेमका तसाच प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. तिथेही पंतप्रधान जॉन्सन यांच्या पक्षाच्याच 50 मंत्र्यांनी राजीनामे दिले. शिवाय त्यांच्या काँझर्व्हेटिव्ह तथा हुजूर पक्षाच्या खासदारांचाच त्यांच्यावर विश्‍वास राहिला नाही. राज्यप्रमुखाची कार्यशैली हाच या बंडामागील समान धागा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बंडाचे नेतृत्व सध्या ऋषी सुनाक करत आहेत. त्यांनाही शिंदे यांच्याप्रमाणेच अपेक्षित असलेले पद मिळणार काय हे अर्थातच तेथील पुढील राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news