पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, गुणवत्ता यादीही प्रसिद्ध झाली आहे. राज्यस्तरीय शहरी भागातील गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीच्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील सेंट टेरेसेस कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राज सोनवणेने 94 टक्के गुण प्राप्त करत प्रथम, तर कोल्हापूरमधील एम.एल.जी. शाळेतील पूर्वा भालेकरने 94 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला.
शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकाल 19.56 टक्के एवढा लागला आहे. यात पाचवीचा निकाल 22.31 टक्के, तर आठवीचा निकाल 15.60 टक्के लागला आहे. राज्यस्तरीय, शहरी, ग्रामीण, सीबीएसई आणि आयसीएसई शाळानुसार गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. अंतरिम निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर झाला होता. त्यावर गुणपडताळणीसाठीचे अर्ज शाळांमार्फत ऑनलाइन मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधिन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळांना पोहोच करण्यात येणार आहे. सातार्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तेजस्विनी बेंद्रे हिने 94 टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळविला. आठवीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील सेंट मिराज स्कूलमधील जानक ढोरेने 97.31 टक्के गुण प्राप्त करत पहिला क्रमांक, तर सांगलीतील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयातील वैधिका यादवने 96.66 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. बीडमधील शारदा विद्या मंदिरमधील कपिल कोरे याने 96 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला.
असा आहे निकाल
इयत्ता नोंदविलेले विद्यार्थी उपस्थित विद्यार्थी पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी