पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत येथून जवळ असलेले उंबरखेड येथील शेतकरी राजेंद्र निरघुडे यांच्या एक एकरमधील कोथिंबीर दोन लाखांना जागेवरच विक्री झाली. यामुळे शेतकरी निरघुडे यांनी समाधान व्यक्त केले.
पिंपळगाव बसवंत येथील देवरत्न आडतचे व टोमॅटो कांदा आडतदार राजेंद्र निरघुडे यांची पाच एकर शेती आहे. ते द्राक्ष न लावता नगदी पिके घेण्यात अग्रेसर आहेत. मराठी महिन्याच्या अंदाजानुसार दरवर्षी आषाढ महिन्यात मेथी, कोथिंबीर ही पिके ते घेत असतात. सध्या शेपू, मेथी, कोथिंबीर शेतात असून, त्यांची दोन एकर कोथिंबीर सध्या काढणीला आली आहे. त्यातील एक एकर कोथिंबीर त्यांनी बाजार समितीत न नेता जागेवरच दोन लाखांना दिली. पावसाचे दिवस असून कधी नुकसान होईल यांची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मजुरी वेळ व सध्या चांगला भाव मिळाल्याने जागेवरच देणे योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. एकता ग्रुपचे संचालक व व्यापारी भीमा शिंदे, उत्तम गडाख, रामेश्वर शिंदे, समाधान पवार आदी व्यापाऱ्यांनी कोथिंबीर खरेदी केली आहे.
सध्या पावसाने कोथिंबीरचे नुकसान झाले असल्याने कोथिंबीरीची मागणी वाढली आहे. तसेच बाजार समितीत खरेदी केलेला माल हा पोहचण्यास उशिर होतो. त्यामुळे बरेच नुकसान होते. शेतातील कोथिंबीर ही सरळ शेतातून विक्रीसाठी घेऊन जात असल्याने ती ग्राहकांना त्वरित मिळू शकते. मजूरवर्गही आमचा असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरी वाचते.
– भीमा शिंदे, व्यापारी
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सिजनेबल नगदी पीकच घेणे पसंत करतो. कोथिंबीर हे पीक साठ दिवसांत येते. निसर्गाची चांगली साथ मिळाल्यास चांगले पैसे मिळतात.
– कैलास निरघुडे, शेतकरी
हेही वाचा :