Renuka Shahane vs Chitra Wagh : ‘त्या लोकांना मत देऊ नका’, रेणुका शहाणेंच्या पोस्टवर चित्रा वाघ संतापल्या, लिहिले खुले पत्र

Renuka Shahane vs Chitra Wagh : ‘त्या लोकांना मत देऊ नका’, रेणुका शहाणेंच्या पोस्टवर चित्रा वाघ संतापल्या, लिहिले खुले पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस 'मराठी माणसाला नोकरी नाही' या जाहीरातीवरुन राज्यात वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. या वादात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी उडी घेतली. त्यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत आवाहन केले की,"मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका". दरम्यान रेणुका शहाणे यांच्या या आवाहनाला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Renuka Shahane vs Chitra Wagh) यांनी खुले पत्र लिहित प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सवाल केला आहे की, "आपला राजकीय हेतू आहे का?"

आपला राजकीय हेतू आहे का?

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले आहे, "ज्यांनी मुंबईकर कोरोनाच्या संकटात असताना करोडो रूपये लुटून खाल्ले आणि मराठी शाळांना टाळे लावले. मात्र उर्दू भवन बांधण्यासाठी अतिउत्साह दाखवला अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का..? यावर उघड भूमिका घेणार की राजकीय विषय म्हणून बगल देणार..? अशा शब्दांत पत्र लिहित चित्रा वाघ यांनी ते रेणुका शहाणे यांना टॅग केले आहे.

त्यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे,

"मा. रेणुकाताई शहाणे
जय महाराष्ट्र, आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, 'सुरभी' या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा 'राष्ट्रीयत्वाचा' आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाची टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडो रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्सर मौन बाळगणार का? आपली, Chitra kwagh (चित्रा किशोर वाघ) "

काय आहे नेमका वाद? : "मराठी माणसाला नोकरी नाही"

मुंबईमध्ये एका कंपनीत ग्राफीक डिझायनरसाठी जाहीरात काढली गेली होती. त्या जाहीरातीमध्ये एचआर जाहीरातीमध्ये म्हणत आहे की, "Marathi people are not welcome here" एचआर महिलेच्या या भुमिकेवरुन विविध स्तरावरुन संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या. सोशल मीडियावर ट्रोल केलं गेले. दरम्यान, अभिनेत्री रेणका शहाणे यांनी या संबंधित X वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

रेणुका शहाणे यांनी 'X' अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.' रेणुका शहाणे यांच्या पोस्टनंतर चित्रा वाघ यांनी खुले पत्र लिहित त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
(Renuka Shahane vs Chitra Wagh)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news