नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा
रयत शिक्षण संस्थेतील बहुचर्चित ऑनलाईन बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. संस्थेच्या सातारा येथे झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर 'रयत' सेवकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रयत शिक्षण संस्थेमध्ये यंदा ऑनलाइन बदल्यांचा निर्णय घेण्यात आला होता. काही सेवकांच्या जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या नियमामुळे सेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या निर्णयविरोधात संस्थेच्या पाचही विभागातील सेवकांनी निवेदने दिली. संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष शरद पवार यांनाही निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. सेवकांच्या बदली प्रश्नी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार, राजेंद्र फाळके, बाळासाहेब बोठे व संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन सेवक, त्यांचा त्याग, संस्थेसाठी देत असलेले योगदान, त्याचा संस्थेच्या शैक्षणिक व सेवकांच्या आर्थिक बाबींवर होणारे दुष्परिणाम व त्रुटी यावर सविस्तर चर्चा केली.
बदली धोरण व अंमलबजावणी याबाबत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र पवार, राजेंद्र फाळके, बाळासाहेब बोठे, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू, के .के घाडगे, बाबासाहेब भोस, दादाभाऊ कळमकर, प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, डॉ.कानडे, डॉ.गणेश ठाकूर यांनी सविस्तर चर्चा व बदली स्थगिती धोरणास पाठिंबा दिला. या सर्व बाबींचा करून शरद पवार यांनी ऑनलाईन बदली धोरणास स्थगिती दिली आहे . त्यामुळे संस्था कर्मचार्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
https://youtu.be/7KwsutS10qQ