अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गट आणि पंचायत समित्यांच्या 170 गणांच्या प्रारुप रचनेवर 17 हरकती | पुढारी

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गट आणि पंचायत समित्यांच्या 170 गणांच्या प्रारुप रचनेवर 17 हरकती

नगर: पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या 85 गट व पंचायत समित्यांच्या 170 गणांच्या प्रारुप रचनेवर मंगळवारी 17 हरकती दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण 23 हरकती दाखल झाल्या आहेत. सुधीर वैरागर व अ‍ॅड. सादिक शिलेदार या दोघांनी जिल्ह्यातील सर्वच गट व गणावर हरकत घेतली आहे. बुधवारी हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे.

जिल्हा परिषद व चौदा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रारुप गट व गण रचना प्रसिध्द केली आहे. या रचनेवर आतापर्यंत 23 जणांनी आक्षेप नोंदविला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे, माजी सभापती रामदास भोर, अनिल खेडकर, नितीन औताडे, डॉ. दिलीप पवार आदीं राजकीय पदाधिकार्‍यांसह 17 जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. सुधीर वैरागर व अ‍ॅड. शिलेदार यांनी संपूर्ण गट व गणांच्या प्रारुप रचनेवरच हरकत घेतली आहे. इतरांनी मात्र आपाल्या तालुक्यातील वा गटातील रचनेवर हरकत उपस्थित केली आहे. बुधवारी हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी किती हरकती दाखल होतात, याची उत्सुकता आहे.

Back to top button