विशाखापट्टणम, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलसाठी 12 महिन्यांचा कालावधी किती विरोधाभासी आहे? मागील वर्षी त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये जाता-जाता शतके झळकावली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिले कसोटी शतक नोंदवले होते. त्यामुळेच अनेकांनी त्याला विराट कोहलीचा वारसदार म्हणून घोषित केले होते; पण 2024 ची परिस्थिती वेगळीच आहे. तो सध्या फॉर्मसाठी झगडतो आहे. त्यामुळे त्याला रवी शास्त्रीने धोक्याचा इशारा दिला आहे.विशाखापट्टणम येथील दुसर्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध त्याला 34 धावा करता आल्या. गिल मिळणार्या संधी वाया घालवतोय. सध्या तो टीकेच्या तोंडावर आहे. त्यात भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गिलला इशारा दिला आहे. त्यांनी चेतेश्वर पुजारा याचे नाव घेऊन गिलला सतर्क राहण्यास सुचवले आहे.
'हा युवा संघ आहे. या युवा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केले आहे; पण हे विसरू नका की, पुजारा वाट पाहतोय. रणजी करंडक स्पर्धेत तो सातत्याने धावा करतोय आणि कसोटी संघात पुनरागमनासाठी तो नेहमी तयार आहे,' असे शास्त्री म्हणाला. पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्ध द्विशतक झळकावले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 49, 43, 43, 66 आणि 91 अशा सातत्याने धावा करत आहेत. तेच दुसरीकडे गिलला मागील काही कसोटींत तिसर्या क्रमांकावर 2, 26, 36, 10, 23 आणि 0 अशा धावा करता आल्या आहेत.
दुसर्या कसोटीचे समालोचन करताना शास्त्री म्हणाले, हा कसोटी सामना आहे. तुम्ही खेळपट्टीवर उभे राहण्याची गरज आहे; अन्यथा तुम्ही संकटात याल. तुम्ही तुमचा खेळ दाखवायला हवा. विशेषतः जेम्स अँडरसनसारखा महान गोलंदाज समोर असताना तुम्ही स्वत:ला सिद्ध करायला हवे, नाही तर तुमचे पॅकअप निश्चित आहे.
हेही वाचा…